GST Collections : जुलै महिन्यातील जीएसटी संकलन 1.65 लाख कोटींच्या घरात!

GST Collections : जुलै महिन्यातील जीएसटी संकलन 1.65 लाख कोटींच्या घरात!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : GST collections : वस्तु आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात वार्षिक आधारावर ११ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै महिन्यात देशभरात जीएसटी संकलन १.६५ लाख कोटी झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. गेल्या महिन्याभरात सरकारला १ लाख ६५ हजार १०५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यातील २९ हजार ७७३ कोटी रुपये सीजीएसटी, तर ३७ हजार ६२३ कोटी रुपये एसजीएसटी आणि ८५ हजार ९३० कोटी रुपये आयजीएसटी स्वरुपात प्राप्त झाला. आयातीत वस्तुवर आकारण्यात आलेल्या ४१ हजार २३९ कोटींचा कर आयजीएसटीमध्ये समाविष्ठ आहे. यासोबतच सेस म्हणून ११ हजार ७७९ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

विशेष म्हणजे जीएसटी (GST collections) लागू झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा जीएसटी संकलनाने १.६० लाख कोटींचा आकडा ओलांडला आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ६१ हजार ४९७ कोटी होते.तर, मे २०२३ मध्ये १ लाख ५७ हजार ९० कोटी रुपयांचा जीएसटी संकलित करण्यात आला होता.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार केंद्राकडून आयजीएसटी संकलनातील ३९ हजार ७८५ कोटी रुपये सीजीएसटी आणि ३३ हजार १८८ कोटी रुपये एसजीएसटीला देण्यात आले आहेत.तडजोडीनंतर ६९ हजार ५५८ कोटी रुपयांचा सीजीएसटी तसेच ७० हजार ८११ कोटी रुपयांचा एसजीएसटी महसुल प्राप्त झाले आहे.

बुधवारी (दि. 2) अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतून ऑनलाईन गेमिंग, घोडदौड आणि कॅसिनोवर लावण्यात आलेल्या २८% जीएसटीवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. (GST collections)

logo
Pudhari News
pudhari.news