नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
Corona Update : देशातील कोरोना महारोगराईचा धोका कमी झालेला नाही. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३ लाख ३७ हजार ७०४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ९,५५० ने कमी आहे. दिवसभरात २ लाख ४२ हजार ६७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचे २१ लाख १३ हजार ३६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १७.२२ टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या १०,०५० वर गेली आहे. ओमायक्रॉन रुग्णसंख्येत ३.६९ टक्के वाढ झाली आहे.
याआधी गुरूवारी दिवसभरात ३ लाख ४७ हजार २५४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ७०३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.५० टक्क्यांवर घसरला होता.
देशात कोरोना महारोगराईची तिसरी लाट शिखरावर पोहचली आहे. अशात लहान मुलांची विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना कोरोना संकट काळात सांभाळ करतांना न घाबरता विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्राकडून काही नियमांमध्ये बदल करीत नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. पाच वर्षाखालील मुलांना मास्क नको, असे स्पष्ट करीत आरोग्य मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.
१८ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज देवू नये, अशी सक्त सूचना देखील केंद्राकडून करण्यात आली आहे. ५ वर्षांखाली मुलांसाठी मास्क बंधनकारक नसले तरी, ६ वर्षांहून अधिक वयांच्या बालकांना मास्क बंधनकारक राहणार असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाला घाबरु नका, काळजी घ्या असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. वय वर्ष ६ ते ११ यांनी पालक आणि डॉक्टरांच्या निगरानीखाली मास्कचा वापर करावा, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १२ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी मास्क घालणे गरजेचे आहे. अलीकडेच, तज्ञांच्या एका गटाने या मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करीत कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ते जारी केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत लागू असलेली साप्ताहिक सुटीच्या दिवसातली संचारबंदी (विकेंड कर्फ्यू) हटविण्याचा दिल्ली सरकारचा प्रस्ताव नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शनिवारी व रविवारी अंमलात आणली जाणारी संचारबंदी आता रद्द केली जावी, अशी शिफारस दिल्ली सरकारने नायब राज्यपालांकडे केली होती.