नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
कोरोनाचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ७९ हजार ७२३ नवे रुग्ण आढळून आले. तर १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रविवारी (९ जानेवारी) १३ लाख ५२ हजार ७१७ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात सध्या ७ लाख २३ हजार ६१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा रोजचा पॉझिटिव्हीटी म्हणजे संक्रमण दर १३.२९ टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,०३३ एवढी झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीतील सुमारे ३०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आज सोमवारपासून (दि.१०) कोरोना प्रतिबंधित लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील व्याधिग्रस्तांना बूस्टर डोस दिला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली होती. यामध्ये सलून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचा राज्य सरकारचा आदेश होता. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यात वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत. या नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.