देशात कोरोनाचा धोका कायम; २४ तासांत १ लाख ६८ हजार नवे रुग्ण, २७७ जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा धोका कायम; २४ तासांत १ लाख ६८ हजार नवे रुग्ण, २७७ जणांचा मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ६८ हजार ६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या कमी दिसून आली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाने ४ लाख ८४ हजार २१३ जणांचा बळी गेला आहे.

आतापर्यंत देशात ६९ कोटी ३१ लाख ५५ हजार २८० चाचण्या करण्यात आल्या. यातील १५ लाख ७९ हजार ९२८ चाचण्या काल १० जानेवारी रोजी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ६९,९५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ८ लाख २१ हजार ४४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रोजचा पॉझिटिव्हिटी रेट १०.६४ टक्के एवढा आहे.

दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,४६१ झाली आहे.

गेल्या रविवारी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत १२.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. रविवारी उच्चांकी १ लाख ७९ हजार ७२३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४५ हजार ५६९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. दरम्यान, १४६ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.६२ टक्क्यांपर्यंत घसरला होता. सोमवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्गदर १३.२९ टक्के, तर आठवड्याचा संसर्गदर ७.९२ टक्के नोंदवण्यात आला होता. देशातील कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

मार्चनंतरच ओसरेल कोरोनाची तिसरी लाट

दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिसर्‍या लाटेचा 'पीक' (रुग्णसंख्येचा उच्चांक) येईल. या काळात दररोज ४ ते ८ लाख नवे रुग्ण आढळतील. दिल्ली आणि मुंबईत १५ जानेवारीला रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल.
'आयआयटी'तील (कानपूर) गणित आणि संगणक विज्ञान या विषयांचे प्रा. मनींद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तविला असून, या संशोधनासाठी त्यांनी संगणकीय पद्धत वापरली आहे. प्रा. अग्रवाल यांनी १५ मार्चच्या जवळपास लाट ओसरण्यास सुरुवात होईल, असेही नमूद केले आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट

दरम्यान, मुंबईत झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्ण संख्येमध्ये सोमवारी मोठी घट झाली होती. २४ तासांत १३ हजार ६४८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये तब्बल ६ हजार ५०० ते ते ७ हजाराने घट झाली आहे. ही मुंबईकरांसाठीच नाही, तर मुंबईत कामानिमित्त येणार्‍या आजूबाजूच्या शहरांतील नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news