नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशात कोरोना संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात नवे १ लाख ४१ हजार ९८६ रुग्ण आढळून आले. तर २८५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत ४०,८९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले. रुग्णसंख्या वाढल्याने रोजचा पॉझिटिव्हिटी रेट ९.२८ टक्के एवढा झाला आहे. सध्या देशात ४ लाख ७२ हजार १६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात लसीचे १५० कोटी डोस देण्यात आले आहेत.
गुरूवारी दिवसभरात १ लाख १७ हजार १०० कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, ३०२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. तर देशाचा कोरोनामुक्ती दर ९७.५७ टक्क्यांपर्यंत घसरला होता. यापूर्वी ६ जून २०२१ रोजी देशात १ लाख ६३६ कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली होती. देशात कोरोना तपासण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे.
कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३,०७१ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १,२०३ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. विशेषतः मुंबईत रुग्णसंख्या अधिक आहे. पण मुंबईत आरोग्य आणीबाणीसारखी कोणतीही स्थिती नसून, परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचा अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाने सरकारला दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतील परिस्थिती पाहून पुढील आठवड्यात निर्बंध लावण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.