भारताशी पंगा, मालदीवला फटका

भारताशी पंगा, मालदीवला फटका
Published on
Updated on
मालदीवच्या चीनप्रेमी मोहम्मद मुईज्जू सरकारने भारताशी उघडपणाने शत्रुत्व पुकारले आहे; परंतु याची मोठी किंमत मालदीवला चुकवावी लागत आहे. मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी घट झाल्याने तेथे पर्यटनाच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
मालदीवमध्ये पोहोचणार्‍या पर्यटकांच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांत पहिल्या क्रमांकावर असलेला भारत आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे मालदीवचे दोन अब्ज डॉलरपर्यंत नुकसान होऊ शकते. कोणतीही कारवाई न करता भारताने चीनप्रेमी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू यांना चांगलाच धडा शिकवला आहे. आता त्याचा परिणाम मालदीवच्या आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. परिणामी, भारतासोबतचे संबंध लवकरात लवकर सुधारावेत, अशी मागणी मालदीवमध्ये वाढू लागली आहे.  भारताविरुद्धच्या राजनैतिक वादाने मालदीवचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च 2024 मध्ये 27,224 च्या तुलनेत मार्च 2023 मध्ये 41,000 हून अधिक भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली आहे.
गेल्यावर्षी मुईज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. याचे कारण या सरकारने भारताला मालदीवमध्ये असलले सर्व सैन्य माघारी घेण्यास सांगितले आहे. वास्तविक राष्ट्रपती निवडणुकांच्या काळापासूनच मुईज्जू  हे भारतद्वेष व्यक्त करत आले आहेत. त्यावेळी भारतीय अशा प्रकारचे पाऊल उचलू शकतात, याची कल्पना बहुधा मुईज्जू यांना नसावी; पण आता झालेले आणि होणारे नुकसान इतके मोठे आहे की, चीनप्रेमी मालदीव सरकारला ते भरून काढणे सोपे जाणार नाही.
सन 2024 च्या सुरुवातीला मुईज्जू सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौर्‍यावर अपमानास्पद टिपण्या केल्या होत्या. यानंतर भारतात मालदीववर बहिष्कार मोहीम सुरू झाली. भारतातील अनेक सेलिबि—टींनी मालदीवच्या विरोधात विधाने केली आणि त्या अधिकार्‍यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. भारताच्या निषेधानंतर मालदीव सरकारने त्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते; मात्र याच काळात मुईज्जू यांनी चीनला भेट दिली आणि मालदीवमध्ये परतताच त्यांनी भारताविरोधात जोरदार वक्तव्ये केली. विमानतळावर उतरताच त्यांनी मालदीवला कोणीही धोका देऊ शकत नाही, असे सांगितले होते. तेव्हापासून भारतासोबतच्या वादामुळे मालदीवचे गंभीर आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेरीस ती खरी ठरली आहे.
मालदीवची अर्थव्यवस्था ही पूर्णतः पर्यटनावर विसंबून आहे. त्यांच्या जीडीपीच्या 56 टक्के भाग पर्यटनातून येतो. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून सन्मान मिळाल्यामुळे या बेटांवर येणार्‍या पर्यटकांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेलेली दिसते. मालदीव पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गतवर्षी डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 17 लाख 57 हजार पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. यामध्ये सर्वाधिक संख्या भारतीय पर्यटकांची होती. मालदीवला या पर्यटनामधून मिळणारा महसूल जवळपास 4 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. मालदीवला भारताखालोखाल रशियातून येणार्‍या पर्यटकांकडून मोठा महसूल मिळतो; पण रशिया-युक्रेन युद्धामुळे तेथून येणार्‍या पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. त्याखालोखाल युरोपियन महासंघातील देशांमधील पर्यटक मालदीवला येत असतात; पण युरोपियन देशांतील पर्यटक अलीकडील काळात भारताला प्राधान्य देताहेत. त्यामुळे त्याचाही फटका मालदीवला बसत आहे. मुईज्जू  यांच्या सरकारला चीनचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या पंखाखाली गेल्याने मालदीव सरकारने भारतविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येते. तेथे शांती सैनिक असलेल्या भारतीय सैनिकांना परत मायदेशी पाठवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news