लसणाचा सर्वात मोठा निर्यातदार भारत

लसूण
लसूण
Published on
Updated on

सांगली :  स्वयंपाकघरात अढळ आणि अटळ स्थान असलेल्या लसणाचा तिखटपणा चांगलाच झटका मारू लागला आहे. जगात लसूण उत्पादनात भारत आघाडीवर आहे, तरी देखील लसणाचा दर मुलखाचा महाग झाला आहे. तब्बल साडेतीनशे रुपये किलोचा लसूण खाणे आता सामान्यांसाठी चैनच ठरत आहे. दरम्यान, देशात महाराष्ट्राचा लसूण उत्पादनात दहावा क्रमांक लागतो.

मसाल्याच्या पिकातील प्रमुख मानल्या जाणार्‍या दोनतीन पिकात लसणाचा समावेश राहतो. गेल्या आठवड्यापासून तब्बल 85 रुपये पावकिलोच्या घरात दर गेल्याने लसूण चांगलाच चर्चेत आहे. एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला, तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी नियमितपणे करण्यात येतो. त्याचप्रमाणे लसणाचे असलेले असंख्य गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत. देशात लसणाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेशात सर्वाधिक होते. त्याखालोखाल राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, आसाम, ओरिसा, हरियाणा, पश्चिम बंगाल राज्यात होते. याखालोखाल महाराष्ट्रात लसणाचे चांगले उत्पादन घेतले जाते.

खास करून लसूण लागवडीसाठी पारंपरिक वाणास शेतकरी पसंती देतात. याचबरोबर पारंपरिक पांढरा, यमुना सफेद, यमुना सफेद 2, यमुना सफेद 3, गोदावरी, श्वेता, जीजी – 4, फुले बसवंत, व्हीआय गार्लिक 1, उटी 4, पार्वती, पार्वती 2 आदी अन्य वाणांची प्रामुख्याने लागवड करण्यात येते. प्रतिहेक्टरी 40 ते 100 क्विंटल उत्पादन देणारे हे पीक 130 ते 140 दिवसात तयार होते.

लसणाच्या निर्यातीत नोव्हेंबर 2023 अखेर भारतातून सर्वाधिक कंटेनरची निर्यात झाली होती. देशातून 2 लाख 2,682 कंटेनर सातासमुद्रापार गेले. त्याखालोखाल चीनमधून 1 लाख 42 हजार 552 कंटेनर आणि दक्षिण कोरियातून 23 हजार 672 कंटेनर निर्यात झाले आहेत. सन 2021-22 मध्ये देशातून 22 हजार 181 टन लसूण निर्यात झाला होता. त्यातून तब्बल 186.19 कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले होते. स्पाईस बोर्ड ऑफ इंडियाकडील आकडेवारीनुसार, सन 2020-21 मध्ये भारतातून लसणाची सर्वाधिक आयात नेपाळने केली होती. (1 हजार 275 टन), त्याखालोखाल युनायटेड अरब अमिरातने 966 टन, थायलंडने 937 टन, ब्रिटनने 486 टन लसूण आपल्या देशातून आयात केला होता. सन 2022-23 मध्ये देशातून 57 हजार 346 टन, तर 2021-22 मध्ये 36 हजार 64 टन लसूण निर्यात झाला होता.

दरात सातत्याने तेजी

लसूण उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र देशात लसणाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचे दिसते. चालू हंगामात लसणाचा दर सर्वसाधारण 14 हजार 500 रुपये प्रतिटन राहिला आहे. सन 2022 मध्ये 9 हजार 700 प्रतिटन दर होता. मात्र सन 2021 मध्ये तब्बल 18 हजार रुपये प्रतिटनाचा भाव होता. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात लसूण निर्यात ठप्प झाल्याने 12 हजार 550 रुपये प्रतिटन असा दर होता. सध्या घाऊक दर तुलनेने कमी असला तरी, बाजारात लसणाचा दर मात्र चांगलाच वाढला आहे.

मध्य प्रदेशची आघाडी….

सन 2022-23 मध्ये मध्य प्रदेशात तब्बल 2 लाख 16 हजार 1300 टन उत्पादन झाले होते. त्याखालोखाल राजस्थानात 53 हजार 918 टन लसूण पिकला होता. अन्य राज्यांतील लसूण उत्पादन पुढीलप्रमाणे :
उत्तर प्रदेश : 2 लाख हजार 190 टन
गुजरात : 1 लाख 565हजार टन
पंजाब : 82 हजार 00 टन
आसाम : 64 हजार 45 टन
ओरिसा : 43 हजार 49 टन
हरियाणा : 39 हजार 86 टन
पश्चिम बंगाल : 36 हजार 98 टन
आणि त्या खालोखाल महाराष्ट्रात 22 हजार 790 टन लसणाचे उत्पादन झाले होते.

लसूण खाण्याचे फायदे…

  • छाती, तसेच पोटावर लसणीचे तेल चोळल्याने वेदना कमी होतात
  • लसूण उष्ण आहे. यामुळे शुक्रजननाचे कार्य करते. कामोत्तेजना वाढविण्यासाठी लसणाचा उपयोग
    होतो
  • वाचाविकारात लसूण उपयुक्त ठरतो
  • लसूण व मिरे वाटून लेप लावल्यास जखमेमध्ये पडलेले किडे मरून जातात
  • लसूण वाटून हुंगायला दिल्याने मुर्च्छा आली असल्यास ती जाते

निवडणूक अन् हंगाम

मध्य प्रदेश, राजस्थानात नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तसेच याचवेळी लसूण काढणीचा हंगाम झाला. या दोन राज्यातूनच लसणाची सर्वाधिक निर्यात होते. मात्र कदाचित यामुळे लसणाच्या दरात तेजी आली असावी, अशी जाणकारांची प्रतिक्रिया आहे. अर्थात आता लसणाच्या वाढलेल्या दराचा फटका मात्र सामान्यांना चांगलाच बसू लागला आहे हे मात्र निश्चित!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news