Champions League T20 : बीसीसीआयच्या पुढाकाराने टी-20 चॅम्पियन्स लीग पुन्हा सुरू होणार?

Champions League T20 : बीसीसीआयच्या पुढाकाराने टी-20 चॅम्पियन्स लीग पुन्हा सुरू होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Champions League T20 : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, जगभरातील फ्रँचायझी किंवा देशांतर्गत टी-20 लीगचे विजेते यांच्यात खेळली जाणारी चॅम्पियन्स टी-20 लीग पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे क्रिकेट बोर्ड या संदर्भात चर्चा करत आहेत. यापूर्वी 2014 मध्ये स्पर्धेचे शेवटचे आयोजन करण्यात आले होते.

क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स म्हणाले की, 'जगभरातील सर्वच क्रिकेट संघांचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यातून चॅम्पियन्स टी-20 लीगचे आयोजन करणे आव्हानात्मक आहे. पण तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ईसीबी आणि बीसीसीआय यांच्यात ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याविषयी चर्चा सुरू आहे. यात महिला संघांदरम्यानही पहिली चॅम्पियन्स लीग खेळवली जाईल. ज्यात डब्ल्यूपीएल, महिला बिग बॅश लीग, द हंड्रेडमधील संघ खेळतील.' (Champions League T20)

चॅम्पियन्स लीगमध्ये जगभरातील वेगवेगळे टी-20 संघ खेळायचे. 2009-10 आणि 2014-15 दरम्यान सहा हंगामात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. 2014 मध्ये चॅम्पियन्स टी-20 लीगचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये एमएस धोनीच्या टीमने विजेतेपद पटकावले होते. त्या स्पर्धेत भारताचे तीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक-एक संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंकेचे संघही खेळले आहेत. चार वेळा ही लीग भारतात तर दोनदा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. भारताच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स टी-20 लीगचे विजेतेपद दोनदा पटकावले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्सने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. (Champions League T20)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news