मुंबई : पुढारी वृत्तसेवा : India Alliance : भाजपविरोधातील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करण्यावर गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवस चालणार्या या बैठकीत खलबते केली जाणार आहेत.
'इंडिया' आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी आहे. या बैठकीसाठी मंगळवारी रात्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी मुंबईत आल्याचे लालू म्हणाले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला मुंबईत पोहोचले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांची त्यांच्या 'जलसा' या निवासस्थानी भेट घेत रक्षाबंधन साजरे केले. India Alliance
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी दाखल होतील. याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (तामिळनाडू), नितीशकुमार (बिहार), हेमंत सोरेन (झारखंड), अरविंद केजरीवाल (दिल्ली), भगवंत मान (पंजाब) आदी अर्धा डझन मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी आहेत.
'इंडिया' आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अनौपचारिक बैठकांचे सत्र होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता वर्तविली आहे. निवडणुकांच्या संदर्भातील विविध मुद्दे या अनौपचारिक बैठकीत चर्चिले जाण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (दि. 1) बैठकीसाठी आलेल्या मान्यवरांचा ग्रुप फोटो काढण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल. दुपारी मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषदेनंतर या बैठकीची सांगता होईल.
या बैठकीचे आयोजक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी सात नेत्यांनाच हॉटेलमधील प्रवेशपत्र देण्यात आले आहे. आयोजनातील या नेत्यांनाही मुख्य बैठकांना प्रवेश नसेल. केवळ पक्षाचे अध्यक्ष, प्रमुखच बैठकीत असतील. इतरांना बैठकीमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे समजते.
हे ही वाचा :