मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Uddhav Thackeray : आमच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या, तरी आम्ही भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध देश आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 'इंडिया' आघाडीकडे पंतप्रधानपदाचे अनेक चेहरे आहेत. भाजपकडे कोणता पर्याय आहे ते सांगा, असे आव्हान या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचे संयोजक व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले.
मुंबईत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या दोनदिवसीय बैठकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे, जयंत पाटील, ठाकरे गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे, शेकापचे नेते जयंत पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. उद्धव म्हणाले, ब्रिटिशांविरोधात 'चले जाव' आंदोलनाची मुंबईतूनच सुरुवात झाली होती. ब्रिटिशही विकास करत होतेच ना! आम्हाला विकास हवा आणि स्वातंत्र्यही हवे. त्याचे रक्षण करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. भारतमातेच्या हातात कोणत्याही हुकूमशहाला आम्ही बेड्या घालू देणार नाही.
मुंबईचा विकास आराखडा नीती आयोग तयार करत असून, त्याचे सादरीकरण मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नीती आयोगाच्या शिष्टमंडळाने केले. मुंबईचा विकास आता नीती आयोगामार्फतच केला जाणार आहे, याचा संदर्भ देत उद्धव म्हणाले की, मुंबई तोडण्याचा यांचा डाव पुन्हा एकदा या नीती आयोगाच्या बैठकीनंतर उघड झाला; पण राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर यांचे सर्व उफराटे निर्णय परत फिरवू.
रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. राज्यकर्ता म्हणून प्रत्येक दिवस महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला गेला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्यायला सांगितले; पण त्याची सुरुवात बिल्कीस बानोकडून करा, याचा पुनरुच्चार करताना उद्धव म्हणाले, मणिपूरमधील त्या दोन महिला, दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटू या सगळ्या महिलांना सुरक्षित वाटावे, असे सरकार आणण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
आजच गॅसचे भाव २०० रुपयांनी कमी करण्यात आले. जसजशी 'इंडिया' आघाडी भक्कम होईल तसतसे एक दिवस असा येईल की, हे सरकार गॅस फ्री देईल. कारण, सरकार गॅसवरच आहे, नऊ वर्षांत कधी बहिणींची आठवण आली नाही; पण 'ये पब्लिक है सब जानती है,' असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हे ही वाचा :