INDW vs AUSW Test : क्रिकेट ‘कसोटी’त भारतीय महिलाच भारी! वानखेडेवर ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित

INDW vs AUSW Test : क्रिकेट ‘कसोटी’त भारतीय महिलाच भारी! वानखेडेवर ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW Test : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी 19 षटकांत 75 धावांचे विययी लक्ष्य आरामात गाठले. भारताकडून स्मृती मंधानाने 61 चेंडूत 38 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय जेमिमाह रॉड्रिग्सनेही 15 चेंडूत 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाचा हा कसोटीतील पहिला विजय ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 261 धावांत संपुष्टात

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियचा दुसरा डाव 261 धावांतच आटोपला. त्यांचे शेवटचे 5 फलंदाज अवघ्या 28 धावांत बाद झाले. ज्यामुळे भारताला विजयासाठी 75 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक 4 बळी घेतले. शिवाय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि राजेश्वरी गायकवाडने 2-2 फलंदाजांना माघारी धाडले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शेफाली वर्माची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर ऋचा घोष आणि स्मृती मानधना यांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. घोष 13 धावा करून बाद झाली. त्यांनंतर जेमिमा (12*) आणि स्मृती (38) यांनी 18.4 षटकात विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 219 धावांत सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 187 धावांची आघाडी होती.

ताहलिया मॅकग्राचे दोन्ही डावात अर्धशतकी खेळी

ताहलिया मॅकग्राने पहिल्या डावात 50 आणि दुसऱ्या डावात 73 धावा केल्या. भारतीय भूमीवर कसोटीच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारी ती पहिली विदेशी खेळाडू ठरली.

भारताचा 46 वर्षांतील पहिला विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये 1977 पासून कसोटी सामने खेळले जात आहेत. मात्र, गेल्या 46 वर्षांत उभय संघांदरम्यान केवळ 11 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 10 कसोटींपैकी ऑस्ट्रेलिया महिला संघाने 4 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. दरम्यान, 11 वा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाच्या महिला संघाने कांगारूंविरुद्धच्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. 11 सामन्यांपैकी अनिर्णित राहिलेले 4 सामने भारतात खेळले गेले. या सामन्यापूर्वी भारतामध्ये या उभय संघांमध्ये एकूण 4 कसोटी सामने खेळले गेले होते, ते सर्व सामने अनिर्णित राहिले. भारत आणि कांगारू संघ यांच्यात ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 6 सामने खेळले गेले आहेत, त्या सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारताचा एकूण सातवा विजय

महिला क्रिकेट संघाचा कसोटी फॉरमॅटमधील हा सातवा विजय ठरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 40 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. याशिवाय भारताला 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर 27 सामने अनिर्णित राहिले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा दुसरा पराभव

टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया (21) आणि इंग्लंड (20) या संघांनंतर कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वात यशस्वी संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाला विकेट्सच्या बाबतीत दुस-या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या आधी 1935 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून झालेला केला होता. आता वानखेडे मैदानावर भारताने त्यांना 8 विकेट्स राखून धूळ चारण्याची किमया केली आहे.

स्नेह राणा प्लेअर ऑफ द मॅच

भारताची अनुभवी खेळाडू स्नेह राणाला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. तिने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात चार बळी घेतले. फलंदाजी करताना स्नेहने पहिल्या डावात नऊ धावा केल्या. या काळात तिने 57 चेंडूंचा सामना करत स्मृती मंधानाला चांगली साथ दिली. दोघींमध्ये पहिल्या डावात दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली.

सामन्याचा स्कोअरबोर्ड :

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव : 219/10 : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात तालिया मॅकग्राने 58 धावा, अ‍ॅलिसा हिली 38 धावा आणि बेथ मुनीने 40 धावा केल्या, तर भारताकडून पूजा वस्त्राकरने 4 बळी घेतले.

भारताचा पहिला डाव : 406/10 : भारताकडून स्मृती मंधानाने 74, जेमिमाह रॉड्रिग्जने 73 धावा, दीप्ती शर्माने 78 धावा आणि ऋचा घोषने 52 धावा केल्या. याशिवाय पूजा वस्त्राकरने 47 धावांची आणि शेफाली वर्माने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : 261/10 : ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांचा संघ 261 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताला विजयासाठी 75 धावांचेच लक्ष्य मिळाले. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मॅकग्राने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. एलिस पेरी 45, बेथ मुनी 33 धावा करू शकल्या. भारताकडून स्नेहा राणाने 4 बळी घेतले.

भारताचा दुसरा डाव : 75/2 : शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना भारतासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आल्या. शेफाली 4 धावा करून बाद झाली. यानंतर ऋचा घोषच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. ती 13 धावा करून बाद झाली. यावेळी मंधानाने 38 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 12 धावांची नाबाद खेळी करत संघाला 8 विकेटने शानदार विजय मिळवून दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news