पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कॅरेबियन संघाने सहा गडी राखून जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 40.5 षटकांत सर्व 10 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 36.4 षटकांत चार गडी गमावून 182 धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना मंगळवारी त्रिनिदादमध्ये होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सलामी जोडीच्या धुवाधारीनंतर नंतरच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारताचा डाव ४०.५ षटकांत १८१ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर इशान किशनने सलग दुसरे अर्धशतक झळकावले, परंतु बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताने या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीला विश्रांती दिली. नाणेफेक जिंकून यजमान वेस्ट इंडीज संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या इशान किशन आणि शुभमन गिल या भारताच्या सलामी जोडीने ९० धावांची सलामी दिली. इशान किशनने आक्रमकपणे फलंदाजी करत पहिल्या वनडेप्रमाणे दुसऱ्याही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. मात्र ही जोडी गुडाकेश मोतीने फोडली. त्याने ३४ धावांवर शुभमन गिलला बाद केले… यानंतर आलेल्या संजूने सावध सुरूवात करण्यास सुरूवात केली. मात्र दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजी करणारा इशान किशन ५५ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. यामुळे सेट झालेले दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. या दोघांच्या विकेटनंतर भारताची मधली फळी ढेपाळली. शेफर्डने किशन पाठोपाठ अक्षर पटेलला १ धावेवर माघारी धाडले. यानंतर आलेला कर्णधार हार्दिक पंड्या ७ धावांची भर घालून परतला. सर्वांची नजर खूप दिवसांनी संधी मिळालेल्या संजू सॅमसनकडे होती. मात्र फिरकीपटू यानिक करिहने त्याला आपल्या फिरकीने चकवले. भारताची अवस्था बिनबाद ९० वरून ५ बाद ११३ धावा अशी झाली. भारताचा निम्मा संघ गारद झाला त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला.
गेल्यानंतर पाऊस थांबला. स्थानिक वेळेनुसार सव्वा बारा वाजता खेळ पुन्हा सुरु झाला. भारताचा निम्मा संघ ११३ धावात माघारी गेल्यानंतर सूर्युकमार यादव आणि रविंद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी रोमारियो शेफर्डने फोडली. त्यानंतर डावखुऱ्या गुडकेश मोतीने पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची शिकार केली. सूर्यकुमार यादव २४ धावांवर बाद झाला. यानंतर शार्दुल ठाकूरने आपल्या अष्टपैलू गुणांची झलक दाखवत फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर विंडीजच्या गोलंदाजीचा नेटाने मुकाबला केला. त्याने दोन चौकारही ठोकले, परंतु १६ धावांवर अल्झारी जोसेफने त्याला पायचित केले. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण १५ मिनिटानंतर पावसाने रजा घेतली. खेळ सुरु झाल्यावर पहिल्याच चेंडूवर उमरान मलिक (०) बाद झाला. कुलदिप यादव (८) आणि मुकेशकुमार (६) यांनी शेवटच्या विकेटसाठी १४ धावा जोडल्याने भारताने ४०.५ षटकांत १८१ धावांची मजल मारली.
182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने आक्रमक सुरुवात केली. काइल मेयर्स आणि ब्रेंडन किंग यांनी झटपट धावा केल्या आणि पॉवरप्लेमध्ये संघाची धावसंख्या 50 धावांपर्यंत नेली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोघांना बाद केले. मेयर्सने 36 आणि किंगने 15 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला अथांजेही सहा धावा काढून शार्दुलचा बळी ठरला. यानंतर कुलदीपने नऊ धावांच्या स्कोअरवर हेटमायरला बाद करून भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या. तथापि, कर्णधार शाई होपने केसी कार्टीसोबत पाचव्या विकेटसाठी शानदार भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. होप 63 धावांवर केसी कार्टी 48 धावांवर नाबाद राहिला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून शार्दुलने तीन आणि कुलदीपने एक विकेट घेतली. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना मंगळवारी त्रिनिदादमध्ये होणार आहे.