IND vs SA WC : द. आफ्रिकेविरुद्ध भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठा बदल? ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

IND vs SA WC : द. आफ्रिकेविरुद्ध भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठा बदल? ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA WC : टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सलग सात सामने जिंकले आहेत. टीम इंडीयाचा आज (5 नोव्हेंबर) आठवा सामना द. आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. ही लढत कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळली जाणार आहे. भारत आणि द. आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत अव्वल दोन संघांमधील हा सामना एक प्रकारे 'अंतिम सामना'च मानला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा 'बर्थडे बॉय' विराट कोहलीवर आहेत. कोहलीला सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. त्यातच आफ्रिकन संघाविरुद्ध विजयासाठी भारताला सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. द. आफ्रिकेने नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत. रोहित सेनेने आतापर्यंत चॅम्पियनप्रमाणे खेळ केला आहे. आता हा सामना जिंकून पहिले स्थान कायम राखण्याचे टार्गेट आहे. (IND vs SA WC)

भारताच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होईल का? (IND vs SA WC)

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते, पण नंतर फिरकीपटूंनाही वळण मिळते. अशा परिस्थितीत भारत या सामन्यात अतिरिक्त फिरकी गोलंदाज (रविचंद्रन अश्विन) खेळवेल का याकडे लक्ष लागले आहे. अश्विनला केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सुरुवातीचा सामना खेळायला मिळाला आहे. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने मैदानात उतरलेल्या प्लेईंग-11 ने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न झाल्यास नवल वाटणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आजवर एक पाऊलही चुकीचे टाकलेले नाही. कोहली (442 धावा) आणि रोहित (402 धावा) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी उपयुक्त खेळी केल्या आहेत. या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्ध 92 धावा करत प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. श्रेयस अय्यरनेही 82 धावा करून भारतीय फलंदाजीची खोली दाखवून दिली. (IND vs SA WC)

जर गोलंदाजीची चर्चा करायची झाल्यास जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अनुक्रमे 15 आणि 14 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने सर्व 7 सामने खेळले आहेत, तर शमीने केवळ 3 सामन्यात हा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही मोहम्मद सिराजने 7 षटकांत केवळ 16 धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, त्यामुळे श्रीलंकेचा संघ 55 धावांत गारद झाला. फिरकीपटू कुलदीप यादव (10 विकेट) आणि रवींद्र जडेजा (9 विकेट) यांनी मधल्या षटकांमध्ये आपली कामगिरी चोख बजावली आहे.

डिकॉकला लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवावे लागणार

द. आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर, शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकचा (545 धावा) फॉर्म गोलंदाजांसाठी दुःस्वप्न ठरत आहे. सध्याच्या विश्वचषकात द. आफ्रिकेच्या संघाने 5 वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एडन मार्कराम (7 डावात 362 धावा), रॅसी व्हॅन डर डुसेन (7 डावात 353 धावा) आणि हेनरिक क्लासेन (315 धावा) हे देखील महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्या गोलंदाजांकडे भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. मार्को जॅनसेनने आतापर्यंत 7 सामन्यात सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. या या दरम्यान, द. आफ्रिकेने 3 आणि भारताने 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी भारताने 37 आणि दक्षिण आफ्रिकेने 50 जिंकले आहेत, तर तीन सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news