IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरेच..!

IND vs SA
IND vs SA
Published on
Updated on

केपटाऊन : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे 30 वर्षांपासूनचे स्वप्न याही वेळेस अपुरे राहिले. दुसर्‍या कसोटीत विराट कोहली जायबंदी झाला. अन् त्याच्या अनुपस्थितीचा डाव साधून दक्षिण आफ्रिकेने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. तिसर्‍या कसोटीत विराटने दमदार पुनरागमन झाले. परंतु, अन्य सहकार्‍यांनी निराशा केली.(IND vs SA)

दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे माफक लक्ष्य पार करून 7 विकेटस्नी विजय मिळवत मालिका 2-1 अशी खिशात घातली. कीगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेने 0-1 अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली.

पहिल्या डावात दोन्ही संघांची जवळपास बरोबरी झाली होती. त्यामुळे दुसर्‍या डावात मोठी धावसंख्या उभारून यजमान संघाला दबावात आणण्याची भारताला संधी होती; पण विराट आणि ऋषभ वगळता कोणीही दक्षिण आफ्रिकन मार्‍यापुढे उभे राहू शकला नाही. विशेषत: ऋषभ पंतच्या नाबाद शतकाने आघाडी दोनशेपार गेली.

अन् भारताच्या विजयाच्या आशा पल्‍लवित झाल्या. परंतु, आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व पीटसरन या जोडीने त्या मावळून टाकल्या. लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे अपयश अन् आर. अश्‍विन व शार्दुल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंच्या बॅटीने दिलेला दगा भारताला महागात पडला.

भारताचे स्वप्न अधुरेच..! (IND vs SA)

तिसर्‍या दिवशी ऋषभने 4 बाद 58 धावांवरून टीम इंडियाचा डाव सावरताना विराटसोबत 94 धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतला अन् भारतीय फलंदाजांनी रांग लावली. भारताचा दुसरा डाव 198 धावांवर गडगडला. त्यात ऋषभच्या नाबाद 100 धावा होत्या. त्याने 139 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. भारताने दुसर्‍या डावात 198 धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात एडन मार्कराम (16) याला माघारी पाठवून शमीने भारताला सुरुवात करून दिली; पण एल्गर व कीगन पीटरसन यांनी त्या स्वप्नांचा चुराडा केला. या दोघांनी दुसर्‍या विकेटस्साठी 78 धावांची भागीदारी केली. एल्गरने 96 चेंडूंत 30 धावा केल्या. पीटरसनने या सामन्यावर वर्चस्व गाजवताना एकहाती सामना फिरवला. चेतेश्‍वर पुजाराने त्याला जीवदान देऊन भारताचा विजयाचा दरवाजा बंद केला.

पीटरसनने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली अन् व्हॅन डेर डुसेनसह तिसर्‍या विकेटस्साठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.
शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा पार्टनरशिप ब्रेकर ठरला. त्याने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून देताना पीटरसनचा त्रिफळा उडवला. पीटसरन 113 चेंडूंत 10 चौकारांसह 82 धावांवर माघारी परतला.

पेव्हेलियनच्या दिशेने पीटरसनचे सार्‍यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहुन कौतुक केले. या विकेटने भारताला पुन्हा एकदा विजयाची स्वप्ने पडू लागली; पण डुसेन व टेम्बा बवुमाने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटस् राखून विजय मिळवून दिला. बवुमा 32, तर डुसेन 41 धावांवर नाबाद राहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news