R Ashwin 5 Wickets Haul : 5 विकेट्स घेण्याचा आर अश्विनचा नवा विक्रम!

R Ashwin 5 Wickets Haul : 5 विकेट्स घेण्याचा आर अश्विनचा नवा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin 5 Wickets Haul : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले असून प्रत्युत्तरात टीम इंडियाने आतापर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 24 आणि यशस्वी जैस्वाल 16 धावांसह क्रीजवर आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली आणि इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला खिंडार पाडत 5 फलंदाजांची शिकार केली. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अश्विनची दमदार कामगिरी (R Ashwin 5 Wickets Haul)

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. कसोटी क्रिकेट करियरमध्ये अश्विनने एका डावात 35 व्यांदा 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक 5 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. अनिल कुंबळेनेही कसोटीत 35 वेळा 5 बळी घेण्याची किमया केली आहे. अश्विनने श्रीलंकेच्या रंगना हेराथला मागे टाकले आहे. हेराथने कसोटी क्रिकेटमध्ये 34 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारे गोलंदाज

मुथय्या मुरलीधरन : 67 वेळा (133 कसोटी)
शेन वॉर्न : 37 वेळा (145)
रिचर्ड हॅडली : 36 वेळा (86)
रविचंद्रन अश्विन : 35 वेळा (99)
अनिल कुंबळे : 35 वेळा
रंगना हेरथ : 34 वेळा (132)

'हे' तीनच गोलंदाज पुढे (R Ashwin 5 Wickets Haul)

कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिकवेळा 5 बळी घेण्याच्या बाबतीत आता फक्त तीन गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या पुढे आहेत. यामध्ये मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि रिचर्ड हॅडली यांचा समावेश आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 67 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनची कसोटी कारकीर्द कशी आहे?

आत अश्विनची गणना भारताच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. जेव्हा तो लयीत असतो तेव्हा तो फलंदाजीचा कोणताही हल्ला उद्ध्वस्त करू शकतो. त्याने भारताकडून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले असून आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये 507 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर एक फलंदाज म्हणून त्याच्या खात्यात 3308 धावाही जमा आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news