चट्टोग्राम; वृत्तसंस्था : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा डाव गडगडला.अक्षर पटेल याने एकाच षटकात दोन बळी घेतले. त्याने ८८ व्या षटकात मुशफिकूरला त्रीफकळाचीत केले. त्याने २३ धावा केल्या. यानंतर नरुल हसन यालाही ३ धावांवर अक्षर पटेल याने तंबूत धाडले. आज ९० षटकांच्या खेळानंतर बांगलादेशने ६ गडी गमावत २७२ धावा केल्या आहेत. विजयाच्या समीप असणार्या टीम इंडियाला आता केवळ चार विकेटची गरज आहे. भारत वि. बांगला देश कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला असून भारताला विजयासाठी चार विकेट्सची गरज आहे. तर भारताला पराभूत करण्यासाठी बांगलादेशला २४१ धावा कराव्या लागणार आहेत.
भारताच्या ५१३ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सलामीची जोडी झाकीर हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांनी यांनी अर्धशतके केली. लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने बिनबाद ११९ धावा केल्या होत्या. १२४ धावांवर बांगलादेशची पहिली विकेट पडली. सलामीवीर नजमुल हुसेन याला उमेश यादवने तंबूत धाडले. त्याने १५६ चेंडूत ६७ धावा केल्या. अक्षर पटेल याने यासर अलीला ५ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर कुलदीप यादवने लिटन दासला आउट केले. उमेश यादवने त्याचा झेल टिपला. चहापानापर्यंत बांगलादेशने ३ बाद १७६ धावा केल्या होत्या. २०८ धावांवर बांगलादेशची चौथी विकेट पडली. सलामीवीर झाकीर हसनने शतक झळकावले आणि तो बाद झाला. अश्वीनने हसनला बाद केले. त्याने २२४ चेंडूत १०० धावा केल्या.
भारत आणि बांगला देश यांच्यात चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल (110) आणि चेतेश्वर पुजारा (नाबाद 102) यांच्या शतकांच्या जोरावर भारताने बांगला देशभोवती फास आवळला असून, त्यांना पराभवापासून वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार हे स्ष्ट झाले होते.
भारत-बांगला देश पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 258 धावांवर घोषित करत बांगला देशसमोर विजयासाठी 513 धावांचे आव्हान ठेवले. भारताने तिसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात बांगला देशचा पहिला डाव 150 धावांत संपुष्टात आणला होता. भारताकडून कुलदीप यादवने 40 धावांत 5, तर मोहम्मद सिराजने 4 विकेटस् घेतल्या. त्यानंतर पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने शुभमन गिल (110) आणि चेतेश्वर पुजारा (102) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर दुसर्या डावात 2 बाद 258 धावा केल्या. यानंतर बांगला देशने तिसर्या दिवसअखेर 12 षटकांत नाबाद 42 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शंतो 25, तर झाकीर हसन 17 धावा करून नाबाद होते.
भारताने बांगला देशचा पहिला डाव 150 धावांत गुंडाळल्यानंतर फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी के. एल. राहुल आणि शुभमन गिल यांनी 70 धावांची दमदार भागीदारी रचली. यात शुभमन गिलच्या आक्रमक खेळाचा वाटा मोठा होता.
के. एल. राहुल 23 धावा करून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत पुजारासोबत दुसर्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. गिलने संधी मिळताच मोठे फटके मारत टी टाईमपर्यंत 80 धावांपर्यंत मजल मारली. टी टाईमनंतर गिलने आपले शतक पूर्ण करण्यासाठी फार वेळ लावला नाही. त्याने चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. गिलने पुजारासोबत दुसर्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. गिल 152 चेंडूंत 110 धावा करून माघारी परतला. यानंतर पुजाराने आपला गिअर बदलला आणि चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुजाराने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करत 130 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. पुजाराचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक ठरले. यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. भारताने बांगला देशसमोर विजयासाठी 513 धावांचे टार्गेट ठेवले.
तत्पूर्वी, कुलदीप यादवने घेतलेल्या 5 विकेटस्च्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बांगला देशचा संघ 150 धावांवर ऑलआऊट केला. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 3, तर उमेश यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. सामन्याच्या दुसर्या दिवशी बांगला देशने 8 बाद 133 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना फक्त 17 धावांची भर टाकता आली. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी नववी आणि दहावी विकेट घेतली. भारताने पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेऊनदेखील फॉलोऑन दिला नाही.
पुजारानेही धावांची गती वाढवली आणि कसोटीतील त्याचे सर्वात जलद शतक झळकावले. तब्बल 3 वर्षे 347 दिवसांनंतर म्हणजे 1,443 दिवसांनी पुजाराच्या खात्यात शतकाची भर पडली. 52 इनिंग्जनंतर केलेली ही खेळी त्याची कसोटीतील सर्वात जलद शतकी खेळी ठरली. त्याचे हे 19 वे शतक ठरले.
32 व्या षटकात यासीर अलीच्या गोलंदाजीवर गिल पायचित होता. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद देताच शाकिब अल हसनने डीआरएस घेतला. बांगला देशच्या खेळाडूंना ही विकेट मिळेल, हा आत्मविश्वास होता आणि ते मोठ्या स्क्रीनकडे आस लावून पाहत होते. तितक्यात तिसर्या पंचांनी मेसेज केला की, डीआरएस सिस्टीम बंद पडली आहे आणि ते ही विकेट तपासू शकत नाहीत. त्यामुळे गिल नाबाद राहिला. एकंदरीतच या कसोटीत बांगला देशला नशिबाने दगा दिला आहे. भारताच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यर फलंदाजी करताना स्टम्पवर चेंडू लागला, बेल्स उडाल्या आणि पुन्हा आहे त्याच जागी जाऊन बेल्स बसल्या. यावेळी स्टम्प लाईटस्ही लागली. परंतु, बेल्स खाली न पडल्याने नियमानुसार श्रेयसला नाबाद देण्यात आले.
चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेटस् घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने 16 षटके गोलंदाजी करताना 40 धावा दिल्या आणि पाच विकेटस् घेतल्या. त्याने आपल्या या स्पेलमध्ये मुशफिकूर रहिम, शाकिब अल हसन, नुरुल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन यांना तंबूत पाठवले. याचबरोबर तो भारतासाठी चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेटस् घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव : सर्वबाद 404 धावा. बांगला देश पहिला डाव : सर्वबाद 150 धावा. भारत दुसरा डाव : 2 बाद 258 (घोषित) बांगला देश दुसरा डाव : 42/0 (झाकिर हसन खेळत आहे 17, नजमुल हसन शंतो खेळत आहे 25 धावा.)