IND vs AUS :  शुभमन गिलचे दमदार शतक

IND vs AUS : शुभमन गिलचे दमदार शतक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू आहे.

  • चहापानापर्यंत भारताने 2 गडी गमावून 188 धावा केल्या आहेत.
  • 61 व्या षटकात शुभमनने शतक झळकावले, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू आऊट केले. पुजाराचे अर्धशतक हुकले, तो 121 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. पुजाराने शुभमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 248 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली.

शुभमन गिलचे दमदार शतक

शुभमन गिलने 194 चेंडूत दुसरे कसोटी शतक झळकावले. एकंदरीत त्याचे हे सातवे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. शुभमनने वनडेमध्ये चार शतके आणि टी-20 मध्ये एक शतक झळकावले आहे. शुभमनने बांगलादेशविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

  • 49 व्या षटकानंतर भारताने 150 धावांचा टप्पा पूर्ण केला.
  • उपाहारापर्यंत भारताने एक गडी गमावून 129 धावा केल्या. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने 55 धावांची भागीदारी केली होती.
  • मिचेल स्टार्कच्या चेंडूवर चौकार मारून शुभमन गिलने कसोटी कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. गिलने 93 चेंडूत 51 धावा केल्या. 29 व्या षटकानंतर भारताने १०० धावांचा टप्पा पार केला.
  • 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूला भारताला पहिला धक्का बसला. मॅथ्यू कुहनेमनने रोहितला लबुशेन करवी झेलबाद केले. रोहितला 58 चेंडूत 35 धावा करता आल्या. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 74 धावांची भागीदारी केली. सध्या शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहेत.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा दबदबा

अहमदाबाद कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा दबदबा कायम राहिला होता. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी द्विशतकी भागीदारी करून इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 480 धावांचा डोंगर उभारण्यात मोलाचे योगदान दिले. भारताकडून आर. अश्विन हा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 91 धावांत 6 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात सावध खेळ करताना दुसर्‍या दिवसअखेर 10 षटकांत बिनबाद 36 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा (17) आणि शुभमन गिल (18) हे खेळपट्टीवर नाबाद होते.

शुक्रवारी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने चार बाद 255 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ख्वाजा आणि ग्रीन यांनी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेटची संधी न देता पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भक्कम भागीदारी रचली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 170 चेंडूंत 114 धावा करून बाद झाला. भारताला दिवसातील पहिले यश दुसर्‍या सत्रात मिळाले. अश्विनने शतकवीर कॅमेरून ग्रीनला यष्टिरक्षक के.एस. भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अ‍ॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाला 387 धावांवर सातवा धक्का बसला. अश्विनने मिचेल स्टार्कला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 409 धावा केल्या होत्या.

चहापानानंतर पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला अक्षर पटेलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 422 चेंडूंत 180 धावा करता आल्या. यानंतर नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अश्विनने मर्फी (41) ला एलबीडब्ल्यू आणि नंतर लायन (34) ला कोहलीच्या हाती झेलबाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आणला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news