SShreyas Iyer vs AUS Test: श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेर! सूर्यकुमारला डेब्यूची संधी

SShreyas Iyer vs AUS Test: श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेर! सूर्यकुमारला डेब्यूची संधी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या गैरहजेरीत भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलला पसंती देऊन मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला खेळवण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या घरच्या मालिकेतून बाहेर पडलेला अय्यर दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. सध्या तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे.

श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार… सूर्या की गिल?

श्रेयसच्या जागेवर सूर्यकुमार आणि गिल हेच दावेदार असल्याची चर्चा रंगली आहे. सूर्यकुमारने आपल्या कारकिर्दीत फक्त मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. तर गिलने कसोटी क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघातील बहुतांश डावांची सलामी दिली आहे. आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत सातत्य राखणारा अय्यर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2-0 अशा मालिका विजयातही प्रभावी ठरला होता. (Shreyas Iyer vs AUS Test)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजेक्शन्स घेतल्यानंतरही अय्यरच्या पाठीच्या खालच्या भागात दुखत आहे. अशा परिस्थितीत त्याला किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'श्रेयस अय्यरची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याचबरोबर दुसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. श्रेयस बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवसाठी मार्ग मोकळा झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करू शकतो.' (Shreyas Iyer vs AUS Test)

संघात सलामीची जोडी म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुलला पहिली पसंती आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवा क्रमांक अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण या क्रमांकावर उतरणारा फलंदाज दुसऱ्या नव्या चेंडूला सामोरे जाईल अशी अपेक्षा असते. (Shreyas Iyer vs AUS Test)

मधल्या फळीतील फलंदाज म्हणून गिलचा वरचष्मा

गिलच्या बाबतीत, कसोटी क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळून आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून गिलचा वरचष्मा राहिला आहे. एका माजी राष्ट्रीय निवडकर्त्याने म्हटले आहे की, 'जेव्हा राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रभारी कोच होता, तेव्हा शुबमन गिल वेस्ट इंडिजच्या 'अ' दौऱ्यावर मधल्या फळीत खेळला. त्यावेळी त्याने द्विशतकही फटकावले. किंबहुना, सुरुवातीला तो मधल्या फळीतील फलंदाज होता ज्याचे रुपांतर सलामीवीरात झाले. दुसरीकडे, फिरकीसाठी अनुकूल खेळपट्ट्यांवर सूर्यकुमारचे खेळणे निर्णायक ठरू शकते. कांगारूचा ऑफ-स्पिनर नॅथन लियॉनला चांगला टर्न मिळाला तर सूर्या त्याच्या फूटवर्कने फिरकीपटूची लय खराब करू शकतो, परंतु पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडच्या विरुद्ध गिल हा एक चांगला पर्याय आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले.

सूर्याची प्रथम श्रेणीतील कारकीर्द कशी आहे?

सूर्यकुमारने 2010 मध्ये मुंबईकडून दिल्लीविरुद्ध रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्या सामन्यात 73 आणि 7 धावा केल्या. सूर्यकुमारने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 79 सामने खेळले असून 44.75 च्या सरासरीने 5,549 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 14 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 200 धावा आहे.

जडेजा सराव शिबिरात सहभागी होणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू होणार आहे. ज्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही समावेश असेल. भारतीय संघातील खेळाडूंना 2 फेब्रुवारीला सकाळी रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे. जडेजाने गेल्या आठवड्यात चेन्नई येथे तामिळनाडूविरुद्धच्या रणजी सामन्यात सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले होते. गोलंदाजीत त्याने एकूण 8 बळी घेत आपली लय साधली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

पहिली कसोटी : 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी : 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी : 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी : 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news