Rohit Sharma World Cup Record : रोहित बनला एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार

Rohit Sharma World Cup Record : रोहित बनला एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma World Cup Record : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी (19 नोव्हेंबर) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तुफानी खेळी केली. मात्र, त्याचे अर्धशतक हुकले. हिटमॅनने 31 चेंडूत 151.61 च्या स्ट्राईक रेटने 47 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. यासह तो विश्वचषकाच्या एका आवृत्तीत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा (597) करणारा फलंदाज बनला आहे.

रोहितने केन विल्यमसनला टाकले मागे (Rohit Sharma World Cup Record)

2023 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणा-या एकूण फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. विराट पहिल्या स्थानी कायम आहे. तर केन विल्यमसनला मागे टाकत रोहित वनडे वर्ल्ड कपच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. विल्यमसनने 2019 च्या विश्वचषकात 578 धावा केल्या होत्या. त्याच वर्षी त्यांचा संघ फायनलमध्येही गेला होता, पण जेतेपदाच्या लढतीत इंग्लंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण आता रोहित शर्मा त्याच्याही पुढे गेला आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना सुरू झाला नव्हता, तेव्हा रोहित शर्माने दहा सामन्यांत 550 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर 30 धावा करताच तो एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला.

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार

597 : रोहित शर्मा (2023)
578 : केन विल्यमसन (2019)
548 : महेला जयवर्धने (2007)
539 : रिकी पाँटिंग (2007)
507 : आरोन फिंच (2019)
482 : एबी डिव्हिलियर्स (2015)
465 : सौरव गांगुली (203)
465 : कुमार संगकारा (2011)

रोहितची या स्पर्धेतील कामगिरी (Rohit Sharma World Cup Record)

रोहित शर्मा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खातेही न उघडता बाद झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध 131 धावांची तुफानी खेळी केली. तसेच पाकिस्तानविरुद्ध 86, बांगलादेशविरुद्ध 48, न्यूझीलंडविरुद्ध 46, इंग्लंडविरुद्ध 87 आणि श्रीलंकेविरुद्ध 4 धावा केल्या. त्याचप्रमाणे त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 40 तर नेदरलँडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 61 धावा फटकावल्या होत्या. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने वेगाने 47 धावा तडकावल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news