पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsIND Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपुष्टात आला आहे. शुक्रवारी सामन्याच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने चार बाद 255 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेटची संधी न देता पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भक्कम भागीदारी रचली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 170 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. अश्विनने ग्रीनला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही.
यानंतर ऑस्ट्रेलियाला 387 धावांवर सातवा धक्का बसला. अश्विनने मिचेल स्टार्कला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 409 धावा केल्या होत्या. चहापानानंतर पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला अक्षर पटेलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 422 चेंडूत 180 धावा करता आल्या. यानंतर नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अश्विनने मर्फी (41)ला एलबीडब्ल्यू आणि नंतर लायन (34)ला कोहलीच्या हाती झेलबाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आणला.
अश्विनने या डावात एकूण सहा विकेट घेतल्या. 32व्यांदा त्याने कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या असून भारतीय भूमीवर 26व्यांदा अशी कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्यांदा कसोटीच्या एका डावात पाच बळी मिळवण्यात अश्विनला यश आले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत 113 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनशिवाय शमीला दोन बळी मिळाले. तर अक्षर-जडेजाने प्रत्येकी एक-एक विकेट पटकावली.