IND vs AUS : अक्षर पटेल-आर. अश्विन फलंदाजीतले तारणहार

IND vs AUS : अक्षर पटेल-आर. अश्विन फलंदाजीतले तारणहार

नॅथन लायनला नागपूर कसोटीत हरवलेली लेंग्थ दिल्ली कसोटीच्या दुसर्‍या दिवशी मिळाली आणि भारतीय डावाला खिंडार पाडायला त्याने सुरुवात केली. शनिवारी सकाळपासूनच खेळपट्टीवर चेंडू पडल्यावर अपेक्षेपेक्षा जास्त वळायला लागला होता, मात्र राहुलला राऊंड द विकेट मारा करताना त्याचा ऑफ स्टम्पवरचा चेंडू थोडासा कमी वळला आणि राहुलला पायचित करून ऑस्ट्रेलियाने भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा आणि कोहली या दोघांचे फिरकीला खेळायचे फुटवर्क वेगळे आहे. रोहित शर्मा मिडल आणि ऑफ स्टम्पच्या झोनमध्ये खेळतो तर कोहली स्टम्प मोकळे सोडत मिडल आणि लेगच्या रोखाने खेळतो. त्यामुळे साहजिकच कोहलीला पायचित पकडायची संधी जास्त मिळते. नॅथन लायनने फार कल्पकतेने काळ रोहित शर्माचा बळी मिळवला. एका फुल लेंग्थ चेंडूला शर्माची बॅट खाली यायच्या आधी चेंडू स्टम्प उद्ध्वस्त करून गेला. पुन्हा पुजाराला पायचित पकडताना लायनने उत्तम लेंग्थचा वापर केला. (IND vs AUS)

श्रेयस अय्यर थोडा कमनशिबी ठरला. एकापाठोपाठ एक चार बळी घेतल्यावर भारतीयांच्या आशा होत्या त्या फक्त विराट कोहलीवर. घरच्या मैदानात कोहली निग्रहाने उतरला होता. कोहलीचा मनोनिग्रह बघता तो एक मोठी खेळायच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेच वाटत होते. जडेजाबरोबर डावही त्याने सावरला, पण मर्फीने जडेजाचा अडथळा दूर केल्यावर कारकिर्दीतील पहिला बळी कोहलीच्या रूपाने मिळवण्यात कुहेनमनला यश मिळाले. हा त्याचा कसोटीतील पहिला बळी मात्र वादग्रस्त ठरला. आयसीसीच्या नियम 36.2.2 प्रमाणे चेंडू जर बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागला असेल तर तो बॅटला लागला असे धरतात, पण कोहली कमनशिबी ठरला. मुळात मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी थोडासा चुकीचा निर्णय दिला; परंतु तिसर्‍या पंचांना हा निर्णय का बदलला नाही असा प्रश्न पडतो. इतके तंत्रज्ञान वापरूनही काही प्रश्न अनुत्तरितच राहतात हे कोहलीच्या बळीतून दिसून आले. (IND vs AUS)

या दिल्लीच्या खेळपट्टीवर 6 बाद 135 असताना भारत जर ऑस्ट्रलियाच्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचू शकेल असे कोणी भाकीत केले असते तर ते हास्यास्पद वाटले असते. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 100 धावांच्या आघाडीची स्वप्ने बघायला लागला होता आणि याचवेळी भारताचे तारणहार ठरले ते अक्षर पटेल आणि अश्विन. अक्षर पटेल सामन्यानंतर म्हणाला, मी जर फलंदाजी केली तर मी बॅटिंग ऑलराऊंडर आहे आणि जर बळी मिळवले तर बॉलिंग ऑलराऊंडर आहे. स्वतः:चे इतके यथार्थ वर्णन इतक्या मोजक्या शब्दात करणे कुणाला जमले नसेल.

सकाळच्या वाताहतीत भारताच्या विजयाच्या आशेचे रोपटे होरपळून गेले होते त्याला अक्षर पटेल आणि अश्विनच्या 114 धावांच्या भागीदारीने नवसंजीवनी मिळाली आणि आशेची पालवी पुन्हा फुटली. कुहेनमन आणि मर्फी आपला माफक प्रभाव टाकत होते, पण नॅथन लायनला दुसर्‍या बाजूने पॅट कमिन्ससारखा अजून एक जलदगती गोलंदाज असता तर भारतीयांना कोंडीत पकडता आले असते. अक्षर आणि अश्विनची भागीदारी फोडायला नवीन चेंडूच कमी आल्याने हे स्पष्ट झाले. आघाडी ही धावांनी महत्त्वाची असतेच, पण ती सौभाग्याचा कुंकवासारखी असते. तिच्या साईजला महत्त्व असण्यापेक्षा ती असण्याला महत्त्व असते. ऑस्ट्रेलियाने नाममात्र 1 धावेची आघाडी मिळाली आणि ती 100 वरून शून्य पुसत आपण 1 वर आणली म्हणून आपण समाधान मानले.

– निमिष पाटगावकर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news