Violence against women : देशात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ; उत्तर प्रदेशात सर्वाधिक

Violence against women : देशात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ; उत्तर प्रदेशात सर्वाधिक
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह राज्य आणि देशभरात मुली, महिलांवरील अत्याचारासह घडणाऱ्या अन्य गुन्ह्यांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवसच वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या २०२२च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ या वर्षात देशात महिलांविरुद्ध एकूण चार लाख ४५ हजार २५६ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२१ साली हा आकडा चार लाख २८ हजार २७८ एवढा होता. महिलांसंबंधी गुन्ह्यांत उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६५ हजार ७४३ गुन्हे नोंदवले गेले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये ४५ हजार ३३१ आणि राजस्थानमध्ये ४५ हजार ५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी महिलांवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान आघाडीवर असून तेथे ५ हजार ३९९ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमध्ये ३ हजार ३९०, मध्यप्रदेशमध्ये ३ हजार २९ आणि महाराष्ट्रात २ हजार ९०४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बलात्कार/सामुहिक बलात्कार करुन करण्यात आलेल्या हत्येचे सर्वाधिक गुन्हे हे उत्तरप्रदेश (६२), मध्यप्रदेश (४१) आणि महाराष्ट्र (२२) झाले आहेत. अॅसिड हल्ल्याच्या गुन्ह्यामध्ये पश्चिम बंगाल (३१), उत्तरप्रदेश (२३) आणि महाराष्ट्र (९) गुन्हे दाखल झाले आहेत. तर, उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधीक १४ हजार ८८७ महिलांचे अपहरण करण्यात आले असून त्या पाठोपाठ बिहारमध्ये १० हजार १९० आणि महाराष्ट्रात ९ हजार २९७ महिलांचे अपहरण झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात ११ हजार ५१२ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, उत्तरप्रदेशात १० हजार ५४८ विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) अल्पवयीन मुलींवरील झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये उत्तरप्रदेशात सर्वाधिक ७ हजार ९५५ आणि महाराष्ट्रात ७ हजार ४६७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात एकूण ४५, ३३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात अपहरण – ९,२९७, विनयभंग – ११,५१२, पोक्सो ७,४६७, बलात्कार २,९०४, सामुहिक बलात्कार करुन हत्या – २२, हुंड्यासाठी हत्या – १८४, आत्महत्येस प्रवृत्त करणे – ७८६, अॅसिड हल्ले – ९ तर मुंबईत एकूण गुन्हे ६, १७६ गुन्ह्यांची नोंद आहे. यात अपहरण – १,१६४, विनयभंग १,८५९, पोक्सो १,१३७, बलात्कार – ३७०, हुंड्यासाठी मृत्यू – ६, हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणे-२१, आत्महत्येस प्रवृत्त करणे – ३५ आणि अॅसिड हल्ला १ गुन्हा नोंद झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news