पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मासिक मानधनात प्रत्येकी १५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.
गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्यात सुमार ८१ हजार आशा स्वयंसेविका आणि ३५०० गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सध्या आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन ३ हजार ५०० रूपये तर गटप्रवर्तकांचे ४ हजार ७०० रूपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी १५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ रूपयांवरून १० हजार करण्यात आले. अंगणवाडी मदतनिसांच मानधन ४४२५ वरून ४५०० रूपये करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही त्यांनी केली.