‘वह’ लिफ्ट मांगती है। मगर देने का नही.. लुटीचा नवा प्रकार

‘वह’ लिफ्ट मांगती है। मगर देने का नही.. लुटीचा नवा प्रकार
Published on
Updated on

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शहरातून जाणार्‍या सर्वच महामार्गांवर गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांना गंडा घालण्याचे उद्योग सुरू आहेत. विविध चौकांनी उभे राहून वाहनचालकांना लिफ्ट मागायची अन् पुढे गेल्यावर चालकांच्या खिशावर 'डल्ला' मारायचा असले प्रकार नित्याचेच झाले असून, या प्रकारामुळे 'वह' लिफ्ट मांगती है मगर देने का नही! असाच काहीसा संदेश चालक एकमेकांना देत आहेत. नगर शहरातून जाणार्‍या महामार्गांवर वाहनचालकांना लुटण्याच्या घटना भरदिवसा घडत आहेत. परंतु लूट करणारी महिला असल्याने सर्वच प्रकरणात गुन्हे दाखल होत नसले, तरी काही चालकांनी धाडस करत त्या महिलेविरोधात तक्रारी दिल्या आहेत. वाहनचालकांना लिफ्ट मागायची. वाहनात बसल्यानंतर शिक्षक अथवा न्यायालयात नोकरीस असल्याचे सांगायचे. चालकाकडून सुटे पैसे घेण्याच्या बहाण्याने अथवा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे काढून घेण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिस स्टेशनची झंझट नको अन् त्यातच गुन्हा करणारी व्यक्ती महिला या सर्व बाबींमुळे प्रत्येक घटनेत गुन्हा दाखल होईल का ही शंका, याचाच फायदा ही महिला घेत आहे.

या महिलेविरोधात काही वाहनचालकांनी गुन्हे दाखल केले आहेत. अनेक वाहनचालकांवर हा प्रकार ओढवला आहे. ते आपापसांत 'आपबीती' सांगतात. तसेच काही सूज्ञ चालक या महिलेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करून इतर चालकांना सावध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु या महिलेकडून दररोज नवनवीन, तसेच परजिल्ह्यातील सावज हेरून चालकांना लुटण्याचा धंदा तेजीत सुरू आहे.

या महिलेचा प्रताप पुणे जिल्ह्यातही महामार्गावर पाहावयास मिळत आहे. रांजणगाव गणपती, शिक्रापूर परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नगर शहरातून जाणारे छत्रपती संभाजीनगर महामार्ग, मनमाड, सोलापूर, जामखेड, पुणे, कल्याण सर्वच महामार्गांवर या महिलेने वाहनचालकांना लुटण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे. पोलिस स्टेशनला चकरा मारून, गुन्हा दाखल होऊन, तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंचा काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. या महिलेचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी चालक वर्ग, तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लिफ्ट दिल्यानंतर…
वाहनात बसल्यानंतर 'संगीता'च्या मधुर स्वरांचा आनंद घेत प्रवास सुरू होतो. भवानी मातेचे 'भगत' असल्याप्रमाणे चर्चा सुरू होते. परंतु चालकाला तिच्या मनात काय 'काळे'- बेरे चालू आहे, याची कल्पनाच येत नाही. चालकास अलगदपणे लुटण्यात येते.

तक्रारअर्जही दाखल
ही महिला तालुक्यातील एका मोठ्या गावात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. संबंधित महिला राहत असलेल्या गावच्या ग्रामस्थांनी या महिलेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार अर्जदेखील दिला आहे.

कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे
चालकांना लुटण्याचे उद्योग या महिलेकडून अनेक वर्षांपासून सुरू आहेत. काही प्रतिष्ठित नागरिकही तिच्या गळाला लागतात. या महिलेचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news