सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : 'आज देशातील शेतकरी संकटात आहे, महागाई, बेकारीचे संकट… त्याचबरोबर देशाचे रक्षणकर्ते असलेल्या सैनिकांचेही हे सरकार रक्षण करू शकत नाही, अशा देशातील बहुसंख्य लोकांचे हिताचे रक्षण करू न शकणार्या, शेतकर्यांच्या दु:खात सहभागी होऊ न शकणार्या भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.
सासवड येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ मैदानावर सोमवारी (दि.17) आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी व युवक मेळाव्यात पवार बोलत होते. या मेळाव्याचे आयोजन माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे व पुरंदर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते. या वेळी बाबासाहेब भिंताडे यांनी स्वागत केले. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा महिला अध्यक्ष भारती शेवाळे, विजय कोलते, सुदाम इंगळे, बंडूकाका जगताप, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, सासवड शहराध्यक्ष बाबासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 'काश्मिरातील पुलवामा येथे लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या ताफ्यावरील झालेल्या हल्ल्यात चाळीस जवान मृत्युमुखी पडले, त्याची वस्तुस्थितीही केंद्र सरकारने लपवून ठेवल्याची बाब आता उघड झाली आहे.
भाजपच्या विचारांचे, त्यांनीच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्त केलेले सत्यपाल मलिक यांनीच सांगितले आहे, की त्या वेळी मागणी करूनही या जवानांना प्रवासासाठी विमाने आणि इतर साधनसामग्री दिली गेली नव्हती, ही बाब मलिक यांनी सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्तीला सांगितली, त्या वेळी त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले,' असे सांगून पवार म्हणाले, की 'जवानांच्या रक्षणाची जबाबदारीही जे सरकार पार पाडू शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.'