लखनौ ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशात मशिदींसह विविध धार्मिक स्थळांवरून आतापर्यंत 1 लाख भोंगे उतरवण्यात आले आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.
महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून गदारोळ सुरू आहे, तर उत्तर प्रदेशात मात्र अत्यंत शांततेत राज्य सरकारच्या पुढाकाराने मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. अद्याप कुठेही वाद झालेला नाही. मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे भोंगे उतरवण्यात उत्तर प्रदेश प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करत आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विनापरवाना भोंगे उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांबाबत फरक करण्यात आलेला नाही. मंदिरांवरील भोंगेही उतरविण्यात आले आहेत. मोठी कारवाई सरकारकडून झाल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात गोंगाट कमी झाला आहे.
रस्ते वाहतुकीसाठी असतात, त्यामुळे कुणीही रस्त्यावर नमाज अदा करू नये, असे शासकीय आदेश आम्ही रीतसर जारी केले. आता रस्त्यावर कुणीही नमाज अदा करत नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.