पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६-अंधेरी पूर्व' मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऋतुजा लटके ६६,२४७ मतांनी विजयी झाल्या आहेत. पण या निकालामध्ये 'नोटा'ला तब्बल १२,६७६ मते मिळाली आहेत. विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतदानानंतर दुसऱ्या क्रमांकांची मते ही 'नोटा'ला पडल्याने सध्या याबाबत चर्चांना ऊत आला आहे.
दरम्यान, भाजपकडून नोटाला अधिकाधिक मते पाडावीत यासाठी प्रयत्न केले गेल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी अतिशय महत्वाची होती. शिवसेना फुटी नंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने ती प्रतिष्ठेची बनली होती. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी तर भापकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपने पटेल यांची उमेदवारी माघारी घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी झालेली होती.
नोटा आणि इतर अपक्षांची एकूण मते ही लटके यांना भेटलेल्या मतांच्या निम्म्याहून कमी आहेत. याचा अभ्यासकांकडून असाही तर्क लावला जातोय की, भाजपची इथे फारच कमी मतदारसंख्या होती किंवा जर अधिक असेल तर ती मतेही लटके यांनी पडली. या निवडणुकीत ७ अपक्ष उमेदवार होते. तर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली होती. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
हे वाचलंत का?