कोल्हापूर जिल्ह्यात अनैतिक संबंध, जमीन, आर्थिक वादातून वर्षभरात 50 जणांचे मुडदे!

कोल्हापूर जिल्ह्यात अनैतिक संबंध, जमीन, आर्थिक वादातून वर्षभरात 50 जणांचे मुडदे!

कोल्हापूर : अनैतिक संबंध, जमीन, आर्थिक वादासह पूर्ववैमनस्य आणि संघटित टोळ्यांच्या वर्चस्वातून सरत्या वर्षात गुन्हेगारी वर्तुळात घडलेला रक्तपात अन् टोकाचा संघर्ष शहरासह जिल्ह्यात थरकाप उडविणारा, शिवाय सामान्यांवर दहशत माजविणारा ठरला. जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्यात 50 जणांचे मुडदे पडले आहेत. पुरोगामी विचारधारा रुजलेल्या जिल्ह्यात अजूनही महिला सुरक्षित नाहीत. 365 दिवसांत 195 महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत; तर 437 पीडितांना विनयभंगाच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे.

बालिंगा (ता. करवीर) येथील ज्वेलर्सवर भरदिवसा घडलेला दरोडा अन् परप्रांतीय दरोडेखोरांनी केलेला गोळीबार, अडीच हजारांवर कोटीच्या घोटाळ्यात बुडालेल्या शाहूपुरीतील ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न विविध कंपन्यांच्या प्रमुखांना ठोकलेल्या बेड्या, जिल्ह्यातील 22 बड्या खासगी सावकारांची जेलवारी, 44 अमली तस्कर, 52 गुटखा तसेच 54 गांजा तस्करांवर झालेली कारवाई या जिल्ह्यातील ठळक घटना म्हणाव्या लागतील.

मटका, जुगार अड्ड्यांसह गांजा, अमली पदार्थ व गुटखा तस्कराविरोधात मोहीम राबवूनही काळे धंदेवाले, तस्करी टोळ्या जोमात आहेत. 2023 मध्ये 1475 गुन्हे दाखल होऊन 2 कोटी 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत होऊनही शहर, जिल्ह्यात सारेच काळे धंदे फार्मात आहेत. दीड कोटीचा गुटखा हस्तगत करून 52 तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. तरीही टपर्‍यांवर गुटख्यांची सर्रास तस्करी दिसून येते.

नवीन 34,522 तरुणांना पासपोर्ट

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासह पर्यटनाच्या निमित्ताने विदेश वारी करणार्‍यांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. 2023 मध्ये क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाकडून 34 हजार 812 पारपत्रे व्हेरिफिकेशनसाठी पोलिस दलाकडे प्राप्त झाली होती. 34 हजार 522 प्रकरणांची निर्गती केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news