सांगली : अंधश्रध्देला पडता फशी… बोकड जातो जिवानिशी

अंधश्रद्धा
अंधश्रद्धा

सांगली : कवलापुरात बोकडाला झाडाला आठ दिवस उलटे टांगून बळी देण्याचा विकृत प्रकार नुकताच घडला. मागच्या महिन्यातील अमावास्येलादेखील असाच प्रकार घडला होता. परंतू त्याची वाच्यता झाली नव्हती. आपल्यावरील गंडांतर टाळण्यासाठी बकरी किंवा बोकडाचा बळी देण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे. देवा-धर्माच्या कार्यात अडथळा आणला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, म्हणून बघ्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे हे प्रकार अजूनही लपूनछपून सुरूच आहेत.

स्वत:च्या संकटनिवारणासाठी मुक्या जिवाचा इतक्या विकृृत पध्दतीने बळी दिला जात आहे. अनेकजण इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी देवऋषी किंवा भोंदू बाबांचा आधार घेत आहेत. सध्या यात्रांचा हंगाम आहे. त्यामुळे अंधश्रध्देचे प्रकार अधिक घडताना दिसतात. भावकी-भावकीतील भांडणातून एकमेकांवर असे प्रयोग केले जातात. ग्रामीण भागात अंगात येणे हा प्रकार आजही खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. वास्तविक हा मानसिक आजार आहे आणि त्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उत्तम इलाज होऊ शकतो, याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सांगितले.

20 जून 2022 रोजी म्हैसाळ येथे एका कुटुंबातील 9 जणांचा गुप्तधनाच्या हव्यासापोटी बळी गेला. 48 वर्षीय मांत्रिक अब्बास अहमदअली बागवान याला त्यावेळी अटक करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी महाराष्ट्र प्रतिबंध आणि निर्मूलन मानवी बळी आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू कायदा, 2013 लागू करण्याची मागणी केली होती. 24 मे 2023 रोजी कवठेमहांकाळ येथील एका मुलाचा बळी अंधश्रध्देपोटी गेला. ताप आणि झोपेतली बडबड यामुळे भूतबाधा झाली, असे वाटून चिमुरड्याला मांत्रिकाकडे नेण्यात आले. मांत्रिकाने भूत उतरवण्यासाठी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मारहाणीत चिमुरड्याने जीव गमावला होता.

गेल्या महिन्यात चिकुर्डे येथील स्मशानभूमीत जादुटोणा आणि भानामतीचा प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या, त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार घडला. संशयितांवर जादुटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी होते. मात्र त्यानंतरही अघोरी आणि विकृत कृती घडताना दिसतात.

महिन्याला 10 ते 15 प्रकरणे

अंनिसकडे दर महिन्याला 10 ते 15 प्रकरणे दाखल.
देवऋषीची फी : 500 पासून लाखापर्यंत
बोकडाची किंमत : 10 ते 15 हजार.
प्रत्येकवेळी फी वेगळी, टप्प्या-टप्प्याने हस्तगत.
पूजासाहित्य, ऊद, विविध वनस्पतींसाठी स्वतंत्र पैशाची मागणी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news