जुन्नर : पोहण्यासाठी गेलेल्या वडगाव आनंद येथील १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

जुन्नर : पोहण्यासाठी गेलेल्या वडगाव आनंद येथील १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

आळेफाटा ; पुढारी वृत्तसेवा : ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षाच्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे गुरूवारी ( दि १४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. साहील राजु लोखंडे (वय १२) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या पिंपळगावजोगा कालव्याचे आवर्तन सुरु असून या कालव्याद्वारे वडगाव आनंद परिसरातील एका ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी शाळेला सुट्टी असल्याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साहील त्याच्या मित्रांसमवेत या ओढ्यात पोहण्यासाठी गेला होता.

सर्व जण पोहोत असताना साहिलला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करत जवळील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला.

दरम्यान बाजूला असलेल्या नागरिकांनी साहील यास पाण्याबाहेर काढून तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

या घटनेची माहिती मिळताच वडगाव आनंद परिसरातील नागरिकांनी ओढ्यावर एकच गर्दी केली. मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आक्रोश केला. साहील लोखंडेच्या मुत्यूमुळे वडगाव आनंद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news