१९६४ मध्ये अविश्वास प्रस्तावावर झाली होती २४ तास चर्चा

१९६४ मध्ये अविश्वास प्रस्तावावर झाली होती २४ तास चर्चा

नवी दिल्ली; सागर पाटील : लोकसभेत मंगळवारी मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला प्रारंभ झाला. या चर्चेसाठी लोकसभा अध्यक्षांनी 12 तासांचा कालावधी निर्धारित केला आहे. त्यामुळे 1964 साली तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 24 तास चर्चा झाल्याचा विक्रम अबाधित राहिला आहे.

मोदी-1 सरकारच्या कार्यकाळात 2018 साली तेलगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर 12 तास चर्चा झाली होती. विरोधकांच्या बाजूने त्यावेळी 126 मते पडली होती तर सरकारच्या बाजूने 325 मते पडली होती. अशाप्रकारे 199 मतांनी मोदी सरकारचा त्यावेळी विजय झाला होता.

पहिला अविश्वास प्रस्ताव जवाहरलाल नेहरू सरकारविरोधात 1963 साली दाखल झाला होता. चीनकडून झालेल्या पराभवानंतर आचार्य कृपलानी यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी सरकारच्या बाजूने 347 तर विरोधकांच्या बाजूने 62 मते पडली होती. 1964 साली एस. एन. द्विवेदी यांनी शास्त्री सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी सरकारच्या बाजूने 315 तर विरोधकांच्या बाजूने 44 मते पडली होती. 1965 साली स्वतंत्र पार्टीचे नेते एम. आर. मसानी यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावेळी सरकारच्या बाजूने 318 तर विरोधकांच्या बाजूने 66 मते पडली होती.

काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव 1966 साली भाकपच्या हिरेंद्रनाथ मुखर्जी यांनी दाखल केला होता. त्यानंतर 1975 पर्यंत अनेकदा गांधी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाले. आणीबाणीनंतर जनता दलाचे मोरारजी देसाई पंतप्रधान बनले; पण 1978 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते सी. एम. स्टीफन यांनी त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आवाजी मतदानात हा प्रस्ताव पडला. 1979 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी देसाई सरकारविरोधात प्रस्ताव दिला. प्रस्तावावरची चर्चा पूर्ण होण्याआधीच देसाई यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि हे सरकार कोसळले.

त्यानंतर सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी सरकारविरोधात 1981 साली जॉर्ज फर्नांडिस यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. प्रस्तावाच्या बाजूने 92 तर सरकारच्या बाजूने 278 मते पडली. यानंतर सलग दोनदा गांधी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाले. दोन्ही वेळा सरकार वाचविण्यात इंदिरा गांधी यांना यश आले. राजीव गांधी सरकारविरोधात 1987 साली अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. सी. माधव रेड्डी यांनी दाखल केलेला हा प्रस्ताव आवाजी मतदानाने नामंजूर झाला होता. 1992 साली नरसिंह राव सरकारविरोधात दोनदा अविश्वास प्रस्ताव दाखल झाले. हे प्रस्ताव भाजपच्या जसवंत सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखल केले होते. 1993 साली राव सरकारविरोधात तिसरा प्रस्ताव दाखल झाला; पण यावेळीही विरोधकांना पराभव पत्करावा लागला. 2003 साली तत्कालीन वाजपेयी सरकारविरोधात सोनिया गांधी यांनी अविश्वास प्रस्ताव दिला. 21 तासांच्या चर्चेनंतर प्रस्तावावर मतदान झाले. यात सरकारच्या बाजूने 314 तर विरोधकांच्या बाजूने 189 मते पडली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news