धार्मिक, जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास

धार्मिक, जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास

कोल्हापूर, गौरव डोंगरे : सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्टस्मुळे धार्मिक, जातीय तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा पोस्टस्, वक्तव्ये व्हायरल केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांवर भारतीय दंडविधान कलम 153 (अ), 295 (अ) आणि कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यामध्ये किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तरुणांनी वेळीच सावध होऊन अशा कारवाईमुळे स्वत:चे करिअर धोक्यात येणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

राज्यभरात गेल्या काही दिवसांत कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही अपप्रवृत्तींचे प्रयत्न सुरू आहेत. इतिहासातील एखादी घटना, छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करून एकमेकांना चिथावणी दिली जात आहे. कोल्हापुरातही अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने दंगल घडली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 500 जणांहून अधिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तरुणांनी करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असे पाऊल उचलून एखादे गैरकृत्य केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन शिक्षण, नोकरीत अडथळे येऊ शकतात. या मुलांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा विचार करून अशा प्रकारांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

प्रमुख कलमे व त्यासाठीची शिक्षा अशी

* कलम 153 (अ) : धार्मिकस्थळावरून जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो. यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

* कलम 295 (अ) : धर्माचा, धार्मिक भावनांचा अवमान करणारे हेतूपुरस्कृत कृत्य करणे. त्यालाही तीन वर्षांपर्यंत शिक्षा.

* कलम 505 : दोन समाजांत, धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी अफवा पसरविणे व सोशल मीडियातून ती व्हायरल करणे. याला तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

सायबर पोलिसांचे विशेष पथक सक्रिय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणते वादग्रस्त अ‍ॅप्लिकेशन वापरता, कोणत्या कम्युनिटी ग्रुपशी संपर्क करता, यावर सायबर टूल्सद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मॉनिटरिंगद्वारे वादग्रस्त पोस्ट तातडीने बाजूला काढण्यातही येत आहेत. गरज पडल्यास पोलिस पर्सनल चॅटवरही लक्ष ठेवू शकतात, असे सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news