जेलमध्ये राहायचे, तर ऑनलाईन पैसे पाठवा कैद्यांची नव्या कैद्याला धमकी

जेलमध्ये राहायचे, तर ऑनलाईन पैसे पाठवा कैद्यांची नव्या कैद्याला धमकी

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  'आत' राहायचे असेल तर ऑनलाईन पैसे पाठवा. आम्हाला येथे पार्सलवाल्याला द्यायचे आहेत, असे म्हणत संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या उपकारागृहातील कैद्याने नव्याने दाखल झालेल्या कैद्याच्या घरच्यांना कारागृहातूनच फोन लावून 5 हजार रुपयांची खंडणी मगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहर पोलिस व उपकारागृह नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच कारागृहातून काही दिवसांपूर्वी चार कैद्यांनी पलायन केले होते. मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली. त्यामुळे संपूर्ण राज्यात संगमनेर उपकारागृहाचे नाव गाजले असतानाच गुरुवारी पुन्हा अटक केलेल्या कैद्यांनी चक्क नवीन दाखल झालेल्या कैद्याच्या घरच्यांना फोन करून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

समजलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि 6) घारगाव परिसरात टाकलेल्या छाप्यात एका कुंटणखान्यातून काही ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली होते. बुधवारी (दि 7) रात्री कारागृहात अगोदरच कैद असलेल्या एका कैद्याने नवीन आलेल्या आरोपीच्या घरी कारागृहातूनच फोन केला आणि पाच हजारांची मागणी केली. आम्हाला येथे पार्सलवाल्याला द्यायचे आहेत. आत राहायचे असेल तर पैसे द्यावे लागणार. गुगल पे नाहीतर फोन पे कर, पण लवकर पैसे पाठव, असा फोन आल्याने त्याच्या घरच्यांना धक्काच बसला.

तुरुंगातून घरच्यांना फोन जाऊ कसा शकतो? आणि त्या कैद्याला आपण पैसे का द्यायचे? या विचारांनी घरातील लोक रात्रभर झोपले नाही. सकाळ होताच पुन्हा एकदा फोन वाजला, शेतकरी असल्याने गाईचे दूध काढत असतानाच फोन आला आणि त्याने पुन्हा विचारला केली, पैसे पाठवले की नाही, असे विचारले. त्यावर घरच्यांनी ऑनलाइन पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर त्या कैद्याने त्यांना एखाद्या मोठ्या दुकानात अथवा मेडिकलमध्ये जाण्याचा सल्लाही दिला. परंतु प्रत्यक्षात येऊन देतो, ऑनलाइन पैसे नसल्याचे सांगूनही तो कैदी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाइकांद्वारे हा सगळा प्रकार पोलिसांना सांगण्यात आला. पोलिसांनी संपूर्ण कारागृहाची झडती घेतली असता कारागृहात फोन आढळला नाही. मग कारागृहातील फोन गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, संगमनेर उपकारागृहाची सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून कारागृहात मोबाईल फोन असूनही सापडला नाही, आणि मोबाईल फोन आत तुरुंगात जातोच कसा, हे न उलगडणारे कोडेच आहे. या प्रकाराने मात्र पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news