राणा-कडू वाद खरंच मिटला की बच्चू कडूंचा मार्ग अधिक खडतर

Kadu Vs Rana
Kadu Vs Rana

मुंबई; रणधीर कांबळे : सत्तेचा सोपान चढताना अनेकांची दमछाक होते. त्यामुळे अनेकजण मध्येच गळपटून जातात. तर काहीजण सत्तेची शिडी चढून जाण्यात यशस्वी ठरतात. सत्तेचा सोपान चढत असताना त्या नेत्यांचं नेतृत्वही घडत असतं. त्यात त्याचं व्यक्तिमत्वही आकार घेत असतं. त्या व्यक्तिमत्त्वाच्या अन् तयार झालेल्या प्रतिमेच्या जोरावर नेता सत्तेच्या केंद्रस्थानी टिकून राहतो. पण याच प्रतिमेला जर तडा गेला तर अनेक दशकांच्या मेहनतीवर पाणी फेरल जाऊ शकतं. त्यामुळं प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून त्यांना जिवाचं रान करावं लागतं. सध्या याच स्थितीत बच्चू कडू आहेत.

बच्चू कडू यांचं नेतृत्व लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करत आकाराला आलं आहे. सामान्य माणसासाठी त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना अंगावर घेतलंय, अनेक केसेस त्यांच्यावर चालू आहेत. अनेक नाट्यमय आंदोलनंही त्यांनी लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकसाठी केली आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे अनेत प्रश्नही मार्गी लागले आहेत. मग ते पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन असो की, एसटीची तोडफोड करणारे आंदोलन सुरू करण्याआधी एसटी चालकाला अभिवादन करणे असो, अशा आंदोलनातून प्रहार संघटना आणि त्याचे नेते म्हणून बच्चू कडूंचे नाव गावागावात पोहचले. राज्यभर लढणारा नेता म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. लढवय्या नेता ही त्यांची प्रतिमा आहे. सत्तेच्या समीकरणात आपण मागे नको म्हणून गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने प्रतिमेला तडा गेला, याची खंत कडूंनी गेल्याच आठवड्यात बोलून दाखवली.

महविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदा राज्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, अचलपूरचा सामान्य मतदारांच्या कडू यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या सत्ता संघर्षाच्या नाट्यात बच्चू यांनी उध्दव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अन् लोकांची अधिक कामे करता येतील, याचे आडाखे बांधले असावेत. पण उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रान उठवलं, ५० खोकी घेऊन आमदार गुवाहाटीला गेले, असा आरोप करत हा संदेश राज्यभर पोहचवण्यात ते यशस्वीही झाले. यामुळे लढणारा नेता म्हणून बिरुदावली मिरवणारे बच्चू कडू अस्वस्थ झाले. त्यांनी आतापर्यंत ज्या उपमा आपल्या नावाभोवती जोडल्या आणि मिरावल्या त्याचा फायदाही त्यांना राजकारणात झाला. 'खोके घेणारे आमदार' ही प्रतिमा त्यांना राजकीयदृष्टया जीवघेणी ठरत आहे. त्यातच विरोधकांच्या आरोपाला उत्तरे देणे थोड सोपं होत, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे रवी राणा यांनीही खोके घेऊन गुवाहाटीला गेलेले आमदार, अशी टीका अमरावतीतील दहीहंडी कार्यक्रमात त्यांच्यावर केली. ज्या शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारला समर्थन दिले, त्या सरकारचे अन् गुवाहाटीच्या ऑपरेशनचे सुत्रधार असणाऱ्या फडणवीसांचे जवळचे आमदारच आरोप करत असल्याने त्यामध्ये सत्यता असल्याचे चित्र राज्यभर तयार झाले आहे.

बच्चू कडूंचे जिथे राजकरण, समाजकारण चालते तिथेच त्यांच्यावर आरोप करण्यात आल्याने त्यांना आधिक आक्रमक भूमिका घेणं भाग होत. त्यामुळे त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. जर खोके घेतल्याचा पुरावा दिला नाही, तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असं थेट आव्हानं दिलं. रवी राणा यांनीही आपण या आव्हानाला आपण भीक घालत नाही, अशी भूमिका घेतली. अमरावतीतील या संघर्षाची झळ थेट मंत्रालया पर्यंत पोहोचली. सरकार समर्थक असलेल्या अस्वस्थ आमदारांच्या भावनेला कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाट मोकळी करून देत, थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवी राणा यांना अवरा, अशी जाहीरपणे मागणी केली. याचे परिणाम दिसू लागताच, मुखमंत्री शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी कडू आणि राणा यांची रुजवात 'वर्षा' निवासस्थानी घालण्याचा प्रयत्न केला. हा वाद मिटवल्याचं वातावण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर माध्यमांसमोर राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण शह-काटशहाच्या राजकारणात माहिर असणाऱ्या फडणवीस यांनी एक विधान केलं. 'माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, या विधानामुळे रवी राणा यांच्या दिलगिरीने बच्चू यांचं पारड जड झाल्याचं चित्र निर्माण होण्याआधीच त्यांच्या राजकीय अडचणी वाढवल्या आहेत. याचं भान कडू यांना असल्यानेच त्यांनी सत्ता गेली चुलीत, आमच्या वाटेला गेला तर कोथळा बाहेर काढू, असा निर्वाणीचा इशारा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

बच्चू कडूंच्या अचलपूर मतदार संघात मुस्लिम, दलित, ओबीसीचे मतदार निर्णायक आहेत. त्यामुळे भाजप सोबत जाणे त्यांना परवडणार नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेत जात आहोत, सत्ता सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे, हे बिंबवण्याचा त्यांचा अग्रक्रम असणार आहे. अमरावतीमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांचं राजकरण अधिक सक्षम व्हावं, यासाठी भाजप त्यांना ताकद देणार हे स्पष्टच आहे. अपंग पुनर्वसनाचे काम असो की, लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणं, यातून कडूंनी आपलं राजकरण अधिक मजबूत केले आहे. त्यांना मंत्रिपद मिळालं तरच त्यांचा मतदार अन् कार्यकर्ता त्यांच्या सोबत राहील असे चित्र आहे. सध्यातरी फडणवीस यांनी केलेलं विधान त्यांना कितीही अडचणीचं असले तरी ते जाहीरपणे नाकरणं सध्याच्या राजकारणात शक्य नाही. त्यामुळेच आपली आक्रमक भूमिका राणा सारख्या आमदाराच्या विरोधात सातत्त्याने ठेवावी लागणार आहे, त्याची सुरवात त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news