पुढारी ऑनलाईन डेस्क : अष्टपैलू शिवम दुबेने (Shivam Dube) अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा तो हिरो ठरला आहे. त्याने बॅटसोबतच चेंडूनेही लक्षवेधी प्रदर्शन केले आहे. आता त्याला एका खास क्लबमध्ये स्थान मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. या क्लबमध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
शिवम दुबेने (Shivam Dube) अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले तर तो टी-20 मध्ये सलग 3 अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील होईल. भारतासाठी फक्त विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी टी-20 सामन्यांमध्ये अर्धशतकांची हॅट्ट्रीक झळकावली आहे. विराटने तर अशी कामगिरी तब्बल तीनवेळा केली आहे.
विराट कोहली : 3 वेळा
केएल राहुल : 2 वेळा
सूर्यकुमार यादव : 2 वेळा
रोहित शर्मा : 1 वेळ
श्रेयस अय्यर : 1 वेळ
शिवम दुबेने मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात 2 षटके टाकली आणि फक्त 9 धावा देऊन 1 बळी घेतला. यानंतर त्याने बॅटने चांगली खेळी केली. त्याने 40 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 3 षटकात 36 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. यानंतर त्याने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी खेळली.