शिवसेनेतील बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया,” महाविकास आघाडीचे सरकार…”

शरद पवार
शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे शिवसेना ठरवेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (दि.२१)  नवी दिल्‍लीत येथील पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले.  राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तर विरोधी बाकावरही बसू, असेही पवार म्‍हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी अशीच बंडाळी झाली होती. त्यावेळी आमदारांना पुन्हा परत आणण्यात आम्हाला यश आले होते. राज्यातील सरकार अडीच वर्षे चांगले चालले आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी भाजपने हे षड्यंत्र रचल्याचा आरोप पवार यांनी या वेळी केला.

महाराष्ट्रात आता जी परिस्थिती सुरु आहे त्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तीन पक्षांमध्ये जो करार आहे त्यानुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता कोणाला काय भूमिका द्यायची हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे सरकार सुरु आहे त्यात काही बदल करावा असे आम्हाला वाटत नाही, एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार असल्याच्या वृत्तावर बोलताना कोण कोणाला भेटत आहे, यात आम्ही काहीही करु शकत नाही अशी प्रतिक्रिया पवारांनी व्यक्त केली.
विधान परिषदेतील क्रॉस व्होटिंग झाल्याबद्दलही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक म्हटले की क्रॉस व्होटिंग होत असते, गेल्या पन्नास वर्षात अनेकवेळा क्रॉस व्होटिंग झाल्याचे पाहिला मिळाले आहे. परंतु, आघाडीत जराही मतभेद नसल्याचे पवार म्हणाले.सरकार कोसळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी हसत सेन्सिबल प्रश्न विचारा असे उत्तर दिले. तसेच अशी वेळ आली तर विरोधी बाकावर बसू असे पवार यांनी स्पष्ट केले.

राजकीय पेचातून मार्ग निघेल

राजकीय पेचातून मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त करून एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का नाही, हे माहित नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.  मुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे शिवसेना ठरवेल, असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या निकालावर नाराज नसल्याचे सांगून क्रॉस व्होटींग होऊनही सरकार व्यवस्थित चालू शकते. हा ५० वर्षांचा अनुभव आहे. शिवसेनेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा कऱणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news