Ichalkaranji Municipal Council : आवाडे-भाजपविरोधात महाविकास आघाडी

Ichalkaranji Municipal Council : आवाडे-भाजपविरोधात महाविकास आघाडी
Published on
Updated on

इचलकरंजी ; संदीप बीडकर : इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक (Ichalkaranji Municipal Council) काही महिन्यांतच लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजप व महाविकास आघाडीच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी इचलकरंजीत राबता ठेवला असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाडेंना बरोबर घेऊन भाजप नगरपालिका निवडणूक लढवणार, असे सूतोवाच केले; तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आवाडे-भाजपविरोधात महाविकास आघाडी, अशी संभाव्य लढत होण्याची चिन्हे आहेत.

इचलकरंजी पालिकेची मुदत 29 डिसेंबर रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पालिकेची सत्ता आपल्याकडे राहावी, यासाठी भाजप व महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सध्या पालिकेत भाजपसमवेत आवाडे गट सत्तेत आहे. (Ichalkaranji Municipal Council)

तसेच आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी आमदार असल्याने भाजपबरोबर युतीचे संकेत मिळत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा दिला असला, तरी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची भाजपबरोबर वाढलेली सलगी भविष्यातील भाजप युतीचेच संकेत देत आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आवाडे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर शहर काँग्रेस काहीअंशी कमकुवत झाली होती. परंतु, पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुन्हा लक्ष घालून काँग्रेसची बांधणी सुरू केली आहे. शिवसेनेची पालिकेतील ताकद सध्या कमी असली, तरी खासदार धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य याच शहराने दिल्याने प्रयत्न केल्यास शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ वाढण्याची संधी आहे.

जांभळे-कारंडे गट एकत्र येणे गरजेचे (Ichalkaranji Municipal Council)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान अंतर्गत गटबाजीने झाले आहे. माजी आमदार अशोकराव जांभळे व मदन कारंडे यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. परंतु, या दोघांमध्ये पक्षीय पातळीवर युती होणे राष्ट्रवादीसाठी हिताचे ठरणार आहे.

राहुल आवाडे भाजपचे लोकसभेचे उमेदवार?

विधान परिषद निवडणुकीवेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जि.प. सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी लोकसभेसाठी आ. आवाडे यांना शब्द दिल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात खा. धैर्यशील माने यांच्याविरोधात राहुल आवाडे, अशी लढत होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news