पुढारी ऑनलाईन डेस्क : Rizwan vs Jansen : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर करो या मरो या सामन्यात पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेशी सामना होत आहे. हा स्पर्धेतील 26 वा सामना आहे. पाकिस्तानने सलग तीन सामने गमावले आहेत आणि विश्वचषक स्पर्धेत त्यांना आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी द. आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच चेपॉकच्या मैदानावर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर दुसरीकडे धर्मशाला येथे नेदरलँडविरुद्ध पराभूत होण्याव्यतिरिक्त द. आफ्रिकेचा संघ अव्वल दर्जाच्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन यांच्यात जोरदार वादावादी झाली. रिझवानने चांगली सुरुवात केली, पण 31 धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी यानसेनने या सामन्यातही चांगली सुरुवात करत पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र अपेक्षेप्रमाणे सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. अब्दुल्ला शफीक 9 तर इमाम उल हक 12 धावा करून बाद झाले. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या जोडीने पाक संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या सहा षटकांत एक गडी गमावून 38 धावा केल्या होत्या. यानंतर मार्को यानसेन आपल्या स्पेलचे चौथे षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या आणि दुसर्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, तिसर्या चेंडूवर इमामने चौकार मारण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षक क्लासेनकडे झेलबाद झाला. नवा फलंदाज रिझवान पहिल्याच चेंडूवर कॉट अँड बोल्ड होऊ शकला असता. पण त्याचा झेल गोलंदाज यानसेनने हुकवला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर रिझवानने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर रिजवानने यानसेनला उद्देशून काहीतरी टीप्पणी केली. ज्यामुळे यानसेन संतापला आणि त्यानेही प्रत्युत्तर दिले. या दरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्याचवेळी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि पंचांनी रिजवान-यानसन यांच्यात मध्यस्थी करून दोघांनाही शांत करण्याचे काम केले. यादरम्यान मैदानावरील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते.
यानसेनने पुढचा चेंडू टाकला आणि रिझवानला चेंडू मारण्यासाठी इशारा केला हे स्लेजिंगनंतर रिझवानच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दोघांमधील या भांडणाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रिझवानला मोठी खेळी खेळता आली नाही आणि 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जेराल्ड कोएत्झीने त्याला विकेटकीपर डिकॉक करवी झेलबाद केले. रिझवानने 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी केली.
या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचा अत्यंत खराब खेळ झाला आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँड्स आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर पाक संघाने सलग तीन सामने गमावले आहेत. भारतानंतर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताननेही पाकिस्तान धूळ चारली आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानला द. आफ्रिकेविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार आहे.