पुढारी ऑनलाईन डेस्क : Womens T20 World Cup 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) रविवारी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणारी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित केली आहे. यात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. ज्यांची विभागणी ए आणि बी अशा दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. स्पर्धेत फायनलसह 23 सामने खेळवले जातील. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 4-4 सामने खेळावे लागतील. गटांतील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर चार संघांमध्ये प्लेऑफची लढत होईल.
स्पर्धेतील सर्व सामने ढाका आणि सिल्हेत येथे खेळवले जातील. तर उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना खेळवला जाईल. टीम इंडियाच्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर 1 आहेत. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2 संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. 4 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंडचा संघ एकमेकांसोबत भिडणार आहे. तर 6 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. यानंतर भारत आणि क्वालिफायर-1 यांच्यात सामना होईल. तर 13 ऑक्टोबरला भारता समोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.
गटवारी-
Group A: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर संघ-1
Group B: दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ-2