तोच खेळ उद्या पुन्हा!

तोच खेळ उद्या पुन्हा!

सन 2022 च्या टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताचे पॅकअप झाले. त्याला आता जवळपास दोन वर्षांचा अवधी उलटला. या कालावधीत प्रवाहाखालून बरेच पाणी वाहून गेले. अनेक बदल झाले. पण, विचाराची दिशा मात्र तीच राहिली. ती विचाराची दिशा अर्थातच कोणतेही धोका न पत्करता आपलाच कम्फर्ट झोन जपणारी!

स्वत:ला ज्यात अतिशय सुरक्षित वाटते, कोणतीही भीती वा धोका सतावत नाही, असे वातावरण किंवा अशी जागा म्हणजे थोडक्यात 'कम्फर्ट झोन'! भारतीय संघाच्या अलीकडील काही स्पर्धांमधील संघनिवडीवर एक दृष्टिक्षेप टाकला तर सातत्याने अपयशाच्या खाईत लोटणारे खेळाडूच पुन:पुन्हा निवडून निवड समिती 'कम्फर्ट झोन'चा हाच खाक्या सांभाळत आहे, असे पदोपदी जाणवते. याचे सर्वात प्रबळ कारण असे की, ज्या भारतीय संघाने मागील टी-20 विश्वचषकात सपशेल नांगी टाकली, त्याच संघातील थोडेथोडके नव्हे तर चक्क आठ खेळाडू यंदाच्या विश्वचषकातही समाविष्ट आहेत! भारतीय क्रिकेट हा कम्फर्ट झोन केव्हा सोडणार, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो आहे!

कोणतीही वाईट सवय सोडण्यासाठी किमान 21 दिवसांचा कालावधी द्यावा लागतो, असे म्हणतात! पण वर्षानुवर्षे एकाच सवयीने जडलेल्या, आपल्याच दुनियेत मश्गुल राहणार्‍या, कम्फर्ट झोनचा तोच तो हट्ट सांभाळणार्‍या कार्यकारिणीला काय म्हणावे? भाकरी करपू नये, म्हणून ती परतावी लागते, त्याचप्रमाणे जगरहाटीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:ला अपडेट करत रहावे, याला तरणोपाय नसतो. पण, संघातील काही सुपरस्टार खेळाडूंच्या पलीकडेही एक जग आहे, याकडे सोयीस्कर कानाडोळा करणार्‍या भारतीय निवड समितीने यंदा विश्वचषक निवडताना 'कम्फर्ट झोन'बाहेर पडण्याची आपली तयारी नाही, हेच एका अर्थाने दाखवून दिलेय!

'सफर मे धूप तो होगी, जो चल सको, तो चलो, मुझे गिरा के तुम संभल सको, तो चलो', हे जगरहाटीचे ब्रीद इथे सोयीस्करपणे विसरले गेले, याचेच हे द्योतक!

आयसीसीची स्पर्धा कोणतीही असो, त्याची अद्ययावत तयारी करण्यासाठी, संघाची जडणघडण करण्यासाठी, घडी बसवण्यासाठी बराच अवधी असतो. नीटनेटके नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी याचा समयोचित मिलाफ असेल तर ही घडी बसवायला फारसा अवधी लागणारही नाही. पण, एखाद्या चौकटीपलीकडे पाहायचेच नाही, असेच ठरवले गेले तर काडीमात्र बदलाची अपेक्षाही गैरच!

2022 च्या टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताचे पॅकअप झाले, त्याला आता जवळपास दोन वर्षांचा अवधी उलटला. या कालावधीत प्रवाहाखालून बरेच पाणी वाहून गेले, अनेक बदल झाले. पण, विचाराची दिशा मात्र तीच राहिली. ती विचाराची दिशा अर्थातच कोणतेही धोका न पत्करता आपलाच कम्फर्ट झोन जपणारी!

जागतिक क्रिकेटमधील टी-20 क्रिकेटने आता आधुनिकतेचे रुपडे घेतले आहे. पण, भारतीय संघव्यवस्थापनाला कदाचित त्याची फारशी दखल घ्यावीशी वाटत नसावी. यंदा वर्षाच्या प्रारंभी रोहित शर्मा व विराट कोहली यांना अफगाणविरुद्ध मालिकेसाठी निवडले गेले, त्यावेळी अनेकांसाठी तो आश्चर्याचा धक्का होता. मुळात रोहित व विराट यांच्या क्लासबद्दल काही शंकाच नाही. त्यांचा अव्वल दर्जा जागतिक स्तरावर कोणत्याही फलंदाजासाठी शब्दश: आदर्शवत, शब्दश: अनुकरणीय! पण जेव्हा भाकरी परतायची, तेव्हा ती परतावीच लागते! ती नाही परतली तर करपणार, ही काळ्या दगडावरची रेघ!

आता रोहित-विराट पहिल्या तीनमध्ये खेळणार, हे साहजिकच अन म्हणूनच 11 टी-20 सामन्यात 89 ची सरासरी व 176.23 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करणार्‍या रिंकू सिंग या डावखुर्‍या फलंदाजाकडे दुर्लक्ष करावे लागणार, हे निश्चितच होते! आयपीएलमधीलच आकडेवारी घेऊयात. विराट व रोहित तेथे आपापल्या फ्रँचायझीतर्फे सलामीला उतरतात. पण, त्या दोघांचाही स्ट्राईक रेट त्यांच्या लौकिकाला साजेसा अजिबात नाही. (सध्याच्या घडीला रोहितचा स्ट्राईक रेट 152.77 तर विराटचा स्ट्राईक रेट 148.08!).

याच निकषावर जेक फ्रेझर-मॅकगर्क 233.33, ट्रॅव्हिस हेड 189.74, अभिषेक शर्मा 195.20, सुनील नरेन 183.66, फिल सॉल्ट 183.33 हे तोलामोलाने रोहित-विराटच्या आसपासही फिरकू न शकणारे खेळाडू यंदा स्ट्राईक रेटबाबतीत मात्र याच रोहित-विराटपेक्षा कित्येक कोस दूर पोहोचताहेत! आयपीएलमध्ये राजस्थानतर्फे खेळणार्‍या यशस्वी जैस्वालने भारतीय संघातर्फे सलामीवीर या नात्याने 2022 टी-20 विश्वचषकानंतर सर्वाधिक 17 सामने खेळले आहेत. यात त्याची कामगिरी 502 धावा, 33.46 ची सरासरी व 161.93 चा स्ट्राईक रेट अशी राहिली आहे. यंदा आयपीएलमध्ये त्याने 157.21 च्या स्ट्राईक रेटसह 316 धावा झोडपल्या आहेत. हा युवा फलंदाज रोहितच्या साथीने सलामीला येईल, असे सध्याचे संकेत असून कोहली नेहमीप्रमाणे त्याच्या पसंतीच्या तिसर्‍या स्थानी फलंदाजीला उतरणे अपेक्षित आहे. रिंकू उपलब्ध नसेल. त्यामुळे डेथ ओव्हर्समधील पॉवर हिटिंगची जबाबदारी प्रामुख्याने ऋषभ पंत, संजू सॅमसन किंवा शिवम दुबे यांच्यावर असेल, हे साहजिक आहे.

पण रोहित-विराटचे पायही मातीचेच आहेत, हे निवड समिती सोयीस्कररीत्या विसरते आहे. विराटने मध्यंतरी त्याच्या स्ट्राईक रेटवर होणार्‍या टीकेचा अप्रत्यक्ष समाचार घेत असताना त्या 'बाहेरून येणार्‍या आवाजां'चा चांगलाच समाचार घेतला होता. पण जे तो पत्रकार परिषदेत बोलला, त्याचे प्रतिबिंब त्याच्या मैदानावरील कामगिरीत उमटत नाही, याचे खरे दु:ख आहे. रोहित व विराटचा अनुभव पाहता ते यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा भारताला एकहाती जिंकून देऊ शकतीलही. पण, विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा म्हणतो, त्याप्रमाणे केवळ सुपरस्टार्स विश्वचषक जिंकून देऊ शकत नाहीत, त्यांचेही पाय मातीचेच, हे कसे विसरणार?

संघनिवडीत नेमके काय घडले?

भारताने यंदा आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघनिवड करताना रिंकू सिंग या धडाकेबाज खेळाडूसह के.एल. राहुलला देखील संघात जागा दिली नाही आणि यामुळे याचे निरनिराळे पडसाद उमटले. याचवेळी अक्षर पटेल, शिवम दुबे, संजू सॅमसन व युझवेंद्र चहल या खेळाडूंना आयपीएलमधील दर्जेदार योगदानाची पुरेपूर पोचपावती मिळाली. यंदा रोहित, विराट, सूर्यकुमार, शिवम दुबे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा यांच्यामुळे फलंदाजी मजबूत असेल. पण गोलंदाजीत जसप्रित बुमराहच्या साथीला ज्यांना समाविष्ट केले गेले, ते सिराज व अर्शदीप यांच्या कामगिरीत आजवर सातत्य राहात आलेले नाही, ही मुख्य चिंता ठरू शकते!

खरी संधी शिवम दुबे व संजू सॅमसनलाच!

आयसीसी विश्वचषकाच्या या मांदियाळीत यंदा आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवायची खरी संधी असेल ती शिवम दुबे व संजू सॅमसन यांनाच! फिनिशर म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध करण्यात यापैकी एकाला जरी यश मिळाले तरी भारतासाठी यंदाच्या विश्वचषकातील ते सर्वात मोठे 'फाईंड' असेल!

कुठे संभवतो धोका?

मागील दोन-एक दशकांचा विचार करता भारताने 2007 टी-20 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले, 2011 ची वन डे विश्वचषक स्पर्धा अगदी थाटात जिंकली आणि त्याही पुढे 2013 मध्ये झळाळत्या चॅम्पियन्स चषकाचाही आपल्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये समावेश केला. त्यानंतर मात्र सर्वच संघातून भारतीय संघ सातत्याने रीत्या हाताने परत येत राहिला आहे. आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे दडपण रोहितसेनेसमोर यंदाही असेल आणि 2013 पासूनचे चित्र पाहता या दडपणाखाली ढेपाळले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सर्वाधिक चर्चा पंड्यावर

अजित आगरकर या बैठकीसाठी स्पेनमधून भारतात दाखल झाले होते. येथे दाखल झाल्यानंतर त्यांची महत्त्वाच्या घटकांशी औपचारिक चर्चा झडली. प्रत्यक्ष बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली ती यंदा आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममधील हार्दिक पंड्याबाबत! पण, दैवदुर्विलास पाहा. इतके झाल्यानंतरही हार्दिक पंड्याला फक्त निवडले गेले नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news