Mendis Admit in Hospital : झंझावाती शतकानंतर कुसल मेंडिस रुग्णालयात ॲडमिट, कारण…

Mendis Admit in Hospital : झंझावाती शतकानंतर कुसल मेंडिस रुग्णालयात ॲडमिट, कारण…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mendis Admit in Hospital : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 8व्या सामन्यात श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने 158.44 च्या स्ट्राईक रेटने 77 चेंडूत 122 धावांची धमाकेदार खेळी केली. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 6 षटकारही मारले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि विश्वचषकातील पहिले शतक आहे. मात्र, या उत्कृष्ट खेळीनंतर त्याला रुग्णालयात ॲडमिट करावे लागले.

मेंडिस क्रॅम्पने त्रस्त

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्दाने मेंडिसच्या प्रकृतीविषयी ट्विट करून मेडिकल अपडेट दिले आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात 77 चेंडूत 122 धावांची शानदार खेळी केल्यानंतर कुसल मेंडिसला मैदानातून परतताना क्रॅम्पने येऊ लागले. ज्यामुळे त्याला वेदना होऊ लागल्या. तो उभा राहू शकत नव्हता. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून तो लवकर बरा होईल. दरम्यान, मेंडिसच्या जागी दुशान हेमंथाला मैदानात पाठवण्यात आले आहे, तर सदिरा समरविक्रमाने मेंडिसच्या अनुपस्थितीत विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली आहे.' (Mendis Admit in Hospital)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र त्यानंतर कुसल मेंडिसने (Kusal Mendis) जबाबदारीने खेळ केला आणि संघाला अडचणीतून बाहेर काढले.

कुशलने (Kusal Mendis) आक्रमक खेळ करून पाकिस्तानच्या वेगवान मा-याची हवा काढली आणि अवघ्या 65 चेंडूत शतक पूर्ण केले. अशाप्रकारे मेंडिस हा विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 70 चेंडूत शतक झळकावले होते.

अवघ्या 5 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेने पहिली विकेट गमावली तेव्हा मेंडिस (Kusal Mendis) क्रीजवर आला. त्यानंतर त्याने पाकच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने निसांकाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. हसन अलीच्या चेंडूवर षटकार ठोकून मेंडिसने आपल्या डावाचे शतकात रूपांतर केले. तो 77 चेंडूंत 14 चौकार आणि 6 षटकारांसह 122 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. पाकचा वेगवान गोलंदाज हसन अलीने कुसल मेंडिसला माघारी धाडले. सीमारेषेजवळ इमाम उल हकने त्याचा झेल पकडला. 2 सामन्यांच्या 2 डावात 198 धावा करून मेंडिस हा विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

मेंडिसने (Kusal Mendis) 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 114 एकदिवसीय सामन्यांच्या 111 डावांमध्ये सुमारे 33 च्या सरासरीने 3,300 हून अधिक धावा केल्या आहेत. त्‍याने त्‍याच्‍या एकदिवसीय करिअरमध्‍ये 3 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत. मेंडिस गेल्या काही वर्षांपासून त्याच्या संघाचा विश्वासार्ह फलंदाज आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात मेंडिस सर्वात जलद शतक झळकावणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. या यादीत एडन मार्कराम (49 चेंडू, वि. श्रीलंका, 2023) पहिल्या स्थानी आहे. तर त्यानंतर केविन ओब्रायन (50 चेंडू, वि. इंग्लंड, 2011), ग्लेन मॅक्सवेल (51 चेंडू, वि. श्रीलंका, 2015) , एबी डिव्हिलियर्स (52 चेंडू, वि. वेस्ट इंडिज, 2015) आणि इऑन मॉर्गन (57 चेंडू, विरुद्ध अफगाणिस्तान, 2019) यांचा क्रमांक लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news