पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Ranking : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयसीसी वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-4 मध्ये समावेश आहे. शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर कायम आहे. विराट आणि रोहितला प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. विराट चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या, तर रोहित पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर कायम आहे. 2023 च्या विश्वचषकात कोहलीने एकूण 765 धावा केल्या, ज्यात 3 शतकांचा समावेश आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंना फायदा झाला आहे. मात्र गोलंदाज मोहम्मद सिराजची घसरण झाली असून त्याला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. असे असले तरी वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. (ICC ODI Ranking)
फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर (826 रेटींग) कायम आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (824) आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ताज्या क्रमवारीत प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. विराट 791 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर रोहित 769 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला फटका बसला आहे. त्याची दोन स्थानांची घसरण झाली आहे. तर विश्वचषकात 552 धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलने 5 स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजी क्रमवारीत सर्वात मोठा फायदा ट्रॅव्हिस हेडला झाला आहे, ज्याने 28 स्थानांनी झेप घेत 15 वा क्रमांक मिळवला आहे. (ICC ODI Ranking)
गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशल महाराज अव्वल स्थानावर आहे. जोश हेझलवूडने 4 स्थानांचा फायदा घेतला असून तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप-10 मध्ये भारताच्या मोहम्मद शमीने प्रवेश केला आहे. तो दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. क्रमवारीत टॉप-10 मध्ये चार भारतीय असून शमी आणि सिराजसह जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आणि कुलदीप यादव सहाव्या क्रमांकावर आहे. कुलदीप पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. तो आणि अफगाणिस्तानचा राशिद खान बरोबरीत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी 10व्या स्थानावरून 9व्या स्थानावर पोहोचला आहे.
बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या स्थानावर आहे. यादीतही अफगाणी खेळाडू राशिद खानचा समावेश आहे. तो चौथ्या क्रमांकावर आहे. टॉप-10 मध्ये जडेजा एकमेव भारतीय आहे, त्याने एक स्थान गमावले आहे आणि तो आता 9व्या वरून 10व्या स्थानावर गेला आहे.