नवे वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन उजाडते. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारताने केपटाऊन कसोटी जिंकत नव्या वर्षाची सुरुवात चांगली केली, पण या वर्षी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पुन्हा असतील त्या विश्वचषकावर. गेल्या वर्षी घरचा विश्वचषक जिंकू न शकल्याचे शल्य भारतीय खेळाडू, करोडो प्रेक्षक अजून उराशी बाळगत असताना या नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आयसीसीने 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. हा विश्वचषक होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड हे आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत असताना आणि अमेरिका क्रिकेटच्या नभांगणात मिणमिणता दूरचा तारा असताना त्यांनी या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीला पाच महिने आधी सादर केले हे कौतुकास्पद आहे. भारताने गेल्या वर्षी जेमतेम 100 दिवस आधी वेळापत्रक आयसीसीला दिले होते आणि त्यातही दुरुस्त्या करत 56 दिवस आधी वेळापत्रक फायनल झाले. त्यामुळे यजमान स्थानिक संघटनांना मैदाने आणि सुविधा बनवायला युद्धपातळीवर काम करावे लागले होते. त्याचप्रमाणे इतक्या कमी वेळात प्रवासाचे नियोजन करताना जगभरातून विश्वचषक बघायला येणार्या प्रेक्षकांना आपली विमानाची तिकिटे, हॉटेल्स चढ्याभावात घ्यावी लागली होती. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि टेक्सास इथल्या मैदानांवर क्रिकेट नवीन नाही, पण विश्वचषकाचे आयोजन करायला त्यांना खेळपट्टी ते प्रेक्षकांचे स्टँडस् यांच्यावर अजून बरीच मेहनत घ्यावी लागेल. न्यूयॉर्कच्या आयसेनहॉवर पार्कमध्ये आठ सामने होणार आहेत, पण त्या मैदानाची आजची द़ृश्ये पाहताना त्यांना हा पाच महिन्यांचा अवधी नितांत गरजेचा आहे. प्रेक्षकांनाही आपल्या प्रवासाचे आयोजन करणे सोयीचे आहे. कारण, सर्व गटांचे साखळी सामने अमेरिकेत झाल्यावर स्पर्धेचा मुक्काम वेस्ट इंडिजमध्ये हलणार आहे. (ICC Men's T20 World Cup)
विश्वचषकासाठी आयोजक आणि प्रेक्षक आपले नियोजन यथावकाश पार पाडतील, पण पाच महिन्यांवर आलेल्या या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे नियोजन कसे असेल? या विश्वचषकाच्या वेळापत्रकाबरोबर नववर्षाच्या सुरुवातीला दुसरी महत्त्वाची बातमी आली ती अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ निवडीची. ऑस्ट्रेलियातील 2022 च्या टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवानंतर टी-20 क्रिकेटसाठी भारतीय संघाने अनेक प्रयोग करून झाल्यावर या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची संघात निवड केल्याने 2024 च्या विश्वचषक संघात ते असणार हे जवळपास नक्की झाले आहे. क्रिकेट कुठच्याही फॉरमॅटमध्ये असो, अनुभवाला पर्याय नाही हा साक्षात्कार भारतीय थिंक टँकला झाला आणि तो वेळेत झाला हे योग्य. या एप्रिलमध्ये रोहित शर्मा 37 वर्षांचा होईल तर नोव्हेंबरमध्ये कोहली 36 वर्षांचा होईल. टी-20 क्रिकेटसाठी हे वय जास्त आहे, असा सर्वसाधारण समज आहे. पण, या दोघांच्या बाबतीत वय हा एकच निकष लागू पडत नाही. (ICC Men's T20 World Cup)
रोहित शर्मा आणि विराट कोहली त्या 2022 च्या विश्वचषकातील अॅॅडलेडला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळलेले नाहीत. यानंतर भारत आजपर्यंत विविध मालिकेत 25 टी-20 आणि एशियन गेम्सचे 3 सामने धरून 28 सामने खेळला आहे. यातील एकही दौर्यासाठी या दोघांनी टी-20 खेळायला उत्सुकता दाखवली नव्हती अथवा भारतीय संघाच्या टी-20 संघाच्या संकल्पनेत ते बसत नव्हते. रोहित शर्माने नुकतेच टी-20 क्रिकेटसाठी आपला विचार झाला नाही तरी हरकत नाही हे बोर्डाला कळवले होते. असे असताना भारतीय क्रिकेटला शर्मा आणि कोहलीशिवाय सध्या तरी पर्याय नाही हे सिद्ध झाले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये असंख्य वेळा तारणहार ठरलेले पुजारा आणि रहाणे यांना नव्या खेळाडूंना वाव दिला पाहिजे म्हणून डावलून टी-20 क्रिकेटमध्ये मात्र अनुभवाला महत्त्व आहे हे तत्त्व राबवायचा हा अजब प्रकार म्हणावा लागेल. आज भारताकडे टी-20 आंतराराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले जवळपास साठ खेळाडू आहेत. असे असतानाही सर्व गाव फिरून झाल्यावर कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि मधल्या फळीचा आधार म्हणून कोहली याला पर्याय नसायला अनेक कारणे आहेत. (ICC Men's T20 World Cup)
2022 च्या विश्वचषकानंतर आपण टी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्यावर सोपवली, पण पंड्याचे दुखापतीमुळे मैदानाबाहेर असणे हे मैदानावर असण्यापेक्षा वाढले आहे. गेल्या वर्षी आयर्लंड दौर्यात आपण जसप्रीत बुमराहला कर्णधार केले. एशियन गेम्स विश्वचषकाच्या तोंडावर होत्या म्हणून तेव्हा ऋतुराज गायकवाड कर्णधार होता. पंड्या विश्वचषकात जायबंदी झाल्यावर टी-20 च्या नेतृत्वाची धुरा आपण सूर्यकुमार यादववर सोपवली. थोडक्यात गेल्या पंधरा महिन्यांत रोहित शर्माचा विचार टी-20 साठी केला नव्हता. पंड्या, सूर्या आता दुखापतींमुळे बाहेर आहेत. विश्वचषकाच्या आधी प्रदीर्घ चालणारी आयपीएल आहे त्यात किती खेळाडू दुखापतग्रस्त होतात हा वेगळाच चिंतेचा भाग आहे. या सर्व परिस्थितीत फिटनेसच्या कारणास्तव कधी बाहेर नसलेल्या आणि प्रचंड अनुभव असलेल्या दिग्गजांभोवती टी-20 चा संघ बांधणे केव्हाही इष्ट ठरते आणि तेच बोर्डाने राहुल द्रविडच्या आग्रहाखातर केले. गेल्या 2023 च्या विश्वचषकातील रोहित शर्माचा फॉर्म आणि कोहलीचे धावांचे सातत्य बघता ते टी-20 क्रिकेटसाठी अडचण न ठरता वरदान ठरतील हे नक्की. जेव्हा रोहित शर्मा आणि कोहलीचा विचार होतो तेव्हा निवड समितीला एकाचा विचार करता येत नाही आणि हे दोघे संघात असले तर अंतिम अकरांमध्ये असतीलच तेव्हा बाकीच्या संघ रचनेवर काय परिणाम होईल?
सलामीच्या जागेला शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन हे पर्याय आहेत. कर्णधार रोहित शर्मा सलामीवीर असताना या चौघांपैकी दोघांचीच निवड होईल आणि अंतिम अकरांमध्ये एकालाच संधी मिळेल. यात गिल, गायकवाड ही उजवी जोडी किंवा जैस्वाल, किशन ही डावखुरी जोडी पर्याय असेल, पण कुणाही दोघांना वगळल्याने बाकीच्या दोघांवर अन्याय होईल. विराट कोहलीमुळे तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, संजू सॅमसन यांच्यापैकी तिघांची संधी हुकेल. सूर्यकुमार यादव फिट होईल आणि विश्वचषकापर्यंत पंड्या फिट झाला तरी ऐनवेळी रोहित शर्मा आणि कोहली यांना वगळतील, असे मला वाटत नाही. तेव्हा या नवोदितांना विश्वचषकासाठी नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल. भारतीय क्रिकेटसाठी 2019, 2023 च्या पन्नास षटकांच्या आणि 2022 चा टी-20 विश्वचषकातील पराभव या ओल्या जखमा आहेत. काही दिवस जाऊन जरा खपली धरेल असे वाटतानाच आठवणींनी जखम पुन्हा भळभळून वाहायला लागते. स्वतः कर्णधार रोहित शर्मा अजून 2023 च्या पराभवाच्या खिन्नतेतून पूर्णपणे सावरलेला नाही. याला पर्याय एकच म्हणजे विश्वचषक जिंकणे. रोहित शर्मा आणि कोहली यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक असेल तेव्हा त्यांच्या उत्तम फॉर्म, अनुभव आणि विश्वचषक जिंकायच्या निग्रहाच्या बळावर त्यांच्याभोवती टी-20चा युवा संघ बांधणे हा विश्वचषक जिंकायचा मॅजिक फॉर्म्युला असू शकतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जुन्या शिलेदारांवर भरवसा ठेवून आपण पुन्हा नवी आशा बाळगणार आहोत, असेच म्हणावे लागेल.