पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 26 व्या सामन्यात द. आफ्रिकेने पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला आणि 5 वा विजय नोंदवला. यासह प्रोटीज संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. बंगळूरच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्व गडी गमावून 270 धावा केल्या. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेने 47.2 षटकांत 9 गडी गमावून लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 3 बळी घेतले. तर मोहम्मद वसीम, हरिस रौफ आणि उसामा मीर यांनी 2-2 विकेट घेतल्या.
यंदाचा एकदिवसीय विश्वचषक पाकिस्तानसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. शुक्रवारी चेन्नईत झालेल्या रोमहर्षक सामन्यात द. आफ्रिकेने त्यांचा अवघ्या एका विकेटने पराभव केला. पाकिस्तानचा स्पर्धेतील हा सलग चौथा पराभव आहे. द. आफ्रिकेसाठी केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी 10व्या विकेटसाठी 11 धावांची विजयी भागीदारी केली. मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर महाराजने विजयी चौकार ठोकला. एडन मार्करामने 91 धावा केल्या, तर शम्सीने पहिल्या डावात 4 बळी घेतले.
271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या द. आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. संघाने केवळ 2 षटकांत 30 धावा केल्या. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने पहिले षटक नव्या चेंडूने टाकले. त्यानंतर डावाच्या दुस-या षटकात डी कॉकने शाहीनची गोलंदाजी फोडून काढली आणि सलग 4 चौकार मारत 19 धावा वसूल केल्या. चौथ्या षटकात द. आफ्रिकेलाही पहिला धक्का बसला. क्विंटन डी कॉक 24 धावा करून शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. त्याच्यानंतर टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी डावाची धुरा सांभाळली. पण बावुमाही 10व्या षटकात झेलबाद झाला. त्याला मोहम्मद वसीमने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. द. आफ्रिकेने 67 धावांत 10 षटकात 2 विकेट गमावल्या.
द. आफ्रिकेने पहिल्या 10 षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. इथून एडन मार्कराम आणि डुसेन यांनी डाव पुढे नेला. दोघांनी 54 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. डुसेन 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर हेन्रिक क्लासेन फारसे काही करू शकला नाही. तो 12 धावा करून बाद झाला. द. त्यामुळे आफ्रिकेची धावसंख्या 4 गडी बाद 136 अशी झाली.
136 धावांवर 4 विकेट गमावल्यानंतर मार्करामने डेव्हिड मिलरच्या साथीने जबाबदारीने खेळ केला. मार्करामने अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे मिलरने उसामा मीरवर हल्ला केला. ही जोडी फोडायला आफ्रिदीला यश आले. त्याने मिलरला झेलबाद केले तेव्हा दोन्ही खेळाडूंनी 70 धावांची भागीदारी केली होती. मिलर 29 धावा करून बाद झाला.
मिलरच्या विकेटनंतर मार्करामने मार्को जॅन्सनसह डावाची धुरा सांभाळली. त्याने यान्सन (20) आणि जेराल्ड कोएत्झेसह छोट्या पण उपयुक्त भागिदारी रचल्या. पण मार्कराम 91 धावा करून उसामा मीरच्या गोलंदाजीवर बाबरकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ गेराल्ड कोएत्झे 10 धावा काढून माघारी परतला. त्यामुळे द. आफ्रिकेने 250 धावांवर 8 विकेट गमावल्या.
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाला अवघ्या 20 धावांवर पहिला धक्का बसला. डावाच्या 5व्या षटकात अब्दुल्ला शफीक 17 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. इमाम उल हकनेही निराशा केली आणि तो अवघ्या 12 धावा करून माघारी परतला. मार्को जेन्सनने पाकच्या या दोन्ही सलामीवीरांची शिकार केली. यानंतर कर्णधार बाबर आझमने मोहम्मद रिझवानच्या सोबतीने पाक संघाचा डाव सावरला. मात्र रिझवान 31 धावा करून तंबूत परतला. या विकेटनंतर इफ्तिखारने काहीवेळ द. आफ्रिकेच्या मा-याचा प्रतिकार केला. पण तोही 21 धावा करून बाद झाला. एका बाजूला बाबर संयमी खेळी करत होता. त्याने 64 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो 50 धावा करून तबरेज शम्सीचा बळी ठरला. स्पर्धेतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने अफगाणिस्तान आणि भारताविरुद्धही अर्धशतके झळकावली होती.
निम्मा संघ 141 धावा गारद झाल्यानंतर सौद शकील आणि शादाब खान यांनी पाकिस्तानचा डाव पुढे नेला. दोघांनी सावध फलंदाजी केली आणि सेट झाल्यानंतर झटपट धावा केल्या. शादाब 36 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. दोघांमध्ये 84 धावांची भागीदारी झाली. मात्र, या दोघांनी केलेल्या भागीदारीने पाकिस्तानला 225 धावांच्या पुढे नेले. काही वेळाने सौदही 52 धावा करून बाद झाला.
सौद आणि शादाब बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजीची पडझड झाली. शादाब 225 धावांच्या धावसंख्येवर बाद झाला, संघाला येथून केवळ 45 धावा करता आल्या आणि शेवटच्या 4 विकेटही गमावल्या. मोहम्मद नवाज (24 धावा) व्यतिरिक्त इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. शाहीन आफ्रिदी केवळ 2, मोहम्मद वसीम ज्युनियर फक्त 7 धावा करू शकले. हारिस रौफ शून्यावर नाबाद राहिला.
पाकिस्तान संघ पुन्हा एकदा पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. द. आफ्रिकेने त्यांना 46.4 षटकांत 270 धावांत गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 आणि कर्णधार बाबर आझमने 50 धावा केल्या. शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिझवानने 31 धावांचे योगदान दिले. मोहम्मद नवाजने 24, इफ्तिखार अहमदने 21 आणि इमाम उल हकने 12 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक नऊ, मोहम्मद वसीम ज्युनियर सात आणि शाहीन आफ्रिदी दोन धावा करून बाद झाले. हरिस रौफ खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने चार आणि मार्को जॅनसेनने तीन बळी घेतले. गेराल्ड कोएत्झीने दोन आणि लुंगी एनगिडीला एक विकेट मिळाली.