ICC Player of the Month : ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी जसप्रीत बुमराहला नामांकन

ICC Player of the Month : ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी जसप्रीत बुमराहला नामांकन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Player of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी निवडलेल्या तीन खेळाडूंची नावे मंगळवारी (7 नोव्हेंबर) जाहीर केली आहेत. यात एक वेगवान गोलंदाज, एक यष्टीरक्षक फलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडूचा समावेश आहे. या यादीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान मिळाले आहे.

जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त ऑक्टोबर 2023 साठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. बुमराहने चेंडूने, डी कॉकने बॅटने आणि रवींद्रने बॅट-बॉलने कहर केला आहे. महिला खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज, बांगलादेशची नाहिदा अक्तार आणि न्यूझीलंडची अमेलिया केर यांना नामांकन मिळाले आहे. (ICC Player of the Month)

क्विंटन डी कॉक (ICC Player of the Month)

क्विंटन डी कॉकने विश्वचषक सामन्यांमध्ये 3 शतके झळकावली. ऑक्टोबरमध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्ध शतके झळकावण्यात त्याला यश आले होते. बांगलादेशविरुद्ध त्याने सर्वाधिक 174 धावांची खेळी केली आहे. ऑक्टोबरमध्ये संघासाठी एकूण 431 धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी 71.83 अशी राहिली आहे. तर याच महिन्यात त्याने यष्टिरक्षक म्हणून 10 झेल आणि एक स्टंपिंग केले. प्लेअर ऑफ द मंथसाठी डी कॉकचे जून 2021 नंतरचे हे पहिले नामांकन आहे.

रचिन रवींद्र (ICC Player of the Month)

रचिन रवींद्रने त्याच्या पहिल्या विश्वचषकातच आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. ऑक्‍टोबरमध्‍ये किवीजच्‍या पहिल्‍या सहा सामन्‍यात त्‍याने 81.20 च्‍या सरासरीने एकूण 406 धावा फटकावल्या आहेत. यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन शतकांचाही समावेश आहे. यासह गोलंदाजीतही त्याने चमक दाखवत 3 विकेट्सही मिळवल्या. या खेळाडूने विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 123 धावांची नाबाद खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 116 धावांची आणखी एक दमदार इनिंग खेळली.

जसप्रीत बुमराह (ICC Player of the Month)

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने आशिया चषक स्पर्धेतून त्याने पुनरागमन केले. तो टीम इंडियासाठी मोठा मॅचविनर असल्याचे सिद्ध झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याने संघासाठी एकूण 14 विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 3.91 आहे. विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 4 आणि इंग्लंडविरुद्ध 3 बळी घेण्यात यशस्वी झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news