पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2023 चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या संघावर वर्चस्व गाजवले आहे. त्यांच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन, श्रीलंका आणि न्यूझीलंडचा प्रत्येकी एक खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. 2023 मध्ये संघातील अनेक खेळाडूंची कामगिरी अप्रतिम राहिली. परिणामी आयसीसी संघात कांगारू खेळाडूंचा दबदबा स्पष्टपणे दिसून येत आहे.
आयसीसीने 2023 सालचा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. यात पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्थान मिळाले असून पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताचे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोन खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टुअर्ट ब्रॉडलाही संघात संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. (ICC Test Team)
आयसीसी दरवर्षी तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघ निवडते. जगभरातील 11 खेळाडूंना या संघांमध्ये स्थान मिळते. मंगळवारी (दि. 23) आयसीसीने 2023 चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ जाहीर केला. ओपनिंगची जबाबदारी उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) आणि दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) यांच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ख्वाजाने 13 सामन्यांत 52.60 च्या सरासरीने 1210 धावा केल्या. यामध्ये सहा शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. करुणारत्नेनेही गतवर्षी श्रीलंकेसाठी शानदार फलंदाजी केली. त्याने 60.8 च्या सरासरीने 608 धावा केल्या.
केन विल्यमसन (न्यूझीलंड) तिसऱ्या क्रमांकावर आणि जो रूट (इंग्लंड) चौथ्या क्रमांकावर आहे. संघात ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत) आणि रविचंद्रन अश्विन (भारत) हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. 33 वर्षीय विल्यमसनने 2023चा शेवट 695 धावांसह केला. या काळात त्याने चार शतके झळकावली. विल्यमसनशिवाय रूटनेही शानदार फलंदाजी केली. त्याचा चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय तो वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्काराच्या शर्यतीत आहे. हेडच्या अष्टपैलू क्षमतेमुळे त्याला संघात स्थान मिळाले. हेडने गेल्या वर्षी 12 सामन्यांत 919 धावा केल्या. भारताच्या रवींद्र जडेजाने चकवा देणारी गोलंदाजी आणि गरज असताना शानदार फलंदाजीच्या जोरावर सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळवले. त्याचबरोबर अॅलेक्स कॅरीने गेल्या वर्षी आपल्या यष्टिरक्षण कौशल्याने सर्वांची मने जिंकली होती. त्याने विकेटमागे एकूण 54 बळी घेतले. यामध्ये 44 झेल आणि 10 स्टंपिंगचा समावेश आहे. कॅप्टन कमिन्सने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत त्यांना चॅम्पियन बनवले. तसेच ऍशेस राखण्यात यश मिळविले. गेल्या वर्षी त्याने 11 सामन्यांत 42 विकेट घेतल्या होत्या. (ICC Test Team)
भारताचा अश्विन गेल्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने चार सामन्यांत 25 बळी घेतले होते. गेल्या वर्षी चमकदार गोलंदाजी करूनही अश्विनला डब्ल्यूटीसी फायनलच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळविता आले नव्हते, पण आयसीसीने अशी चूक केली नाही. त्याचबरोबर स्टार्कने 2023 मध्ये नऊ सामन्यांत 38 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टुअर्ट ब्रॉडच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेसमध्ये सर्वाधिक 22 विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे आयसीसीने आपल्या कसोटी संघात पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा एकाही खेळाडूला स्थान दिलेले नाही.
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (श्रीलंका), जो रूट (इंग्लंड), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), अॅलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया, कर्णधार), रविचंद्रन अश्विन (भारत), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) आणि स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड).