पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये (IPL) आपल्या वेगवान खेळीने खळबळ माजवणारा लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) धक्कादायक विधान केले आहे. 'माझे लक्ष्य हे जगातील सर्वात वेगवान गोलंदाज बनण्याचे नसून जगातील सर्वोत्तम गोलंदाज बनने हे आहे,' असे त्याने म्हटले आहे.
गेल्या शनिवारी आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मयंक यादवने (Mayank Yadav) लखनौ सुपर जायंट्सकडून पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. त्याने आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला आणि आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंजाब किंग्जच्या डावादरम्यान, मयंकने (Mayank Yadav) 12 व्या षटकाचा पहिला चेंडू 155.8 किमी प्रतितास वेगाने टाकला. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील वेगवान चेंडू टाकणारा टॉपचा सहावा गोलंदाज ठरला.
या सामन्यानंतर एकीकडे मयंक यादवच्या (Mayank Yadav) वेगवान गोलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे, तर दुसरीकडे त्याने वेगवान गोलंदाज बनणे हे आपले ध्येय नसल्याचे वक्तव्य केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मला जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज व्हायचे नाही. याचे स्वप्न देखील मी कधी पाहिलेले नाही. मला फक्त जगातील सर्वोत्तम गोलंदाज व्हायचे आहे. फलंदाजांना कमीत कमी धावा देणे आणि त्यात सातत्यपूर्ण कामगिरी कशी होईल यासाठी मी प्रयत्नशील आहे. वेग हा एक माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे, ज्याचा फायदा लाईन-लेंथ आणि चेंडूचा मारा कुठे करायचा यांना होतो.'