न्यूयॉर्क : वेगाने बदलत चाललेले हवामान, वाढते तापमान, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ, जगभरातील पर्यावरणाला निर्माण झालेला धोका हे सर्व आता जगाच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. पर्यावरणात निर्माण झालेल्या असंतुलनामुळे ही संकटे उभी ठाकलेली आहेत. त्यामागील प्रमुख कारणांमध्ये सिमेंट-काँक्रिटची बेसुमार निर्मितीही आहे. आता संशोधकांनी सिमेंटला पर्यावरणपूरक असा पर्याय शोधला आहे. त्यांनी बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूंपासून एक विशिष्ट हायड्रो जेल (Hydro Gel) विकसित केले आहे. ते सिमेंटला उत्तम पर्याय ठरू शकते असा त्यांचा दावा आहे.
हे जेल (Hydro Gel) पर्यावरणासाठीही चांगले असून सिमेंटच्या तुलनेत अधिक स्वस्तही आहे. ते इतके मजबूत आहे की प्रत्येक वर्ग सेंटीमीटरवर 380 किलोचा भार सहज झेलू शकते. याचा अर्थ सिमेंट आणि विटेपासून बनवलेल्या घरांऐवजी अशा जेलपासून बनलेली घरे अधिक मजबूत असतील. शिवाय या घरांमध्ये सिमेंटच्या घराच्या तुलनेत कमी गोंगाट येईल. हे हायड्रो जेल सिमेंटही आहे आणि विटही आहे.
हे जेल बनवण्याच्या क्रियेत प्रदूषण होत नाही. ते उष्णतेऐवजी जीवाणूपासून प्रकाशसंश्लेषणाच्या म्हणजे प्रकाशाच्या मदतीने विकसित होते. या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जित होण्याऐवजी तो शोषला जातो. सिमेंट बनवण्याच्या क्रियेत चुना तोडण्यासाठी वापरण्यात येणार्या उष्णतेपासून कार्बन वायूंचे उत्सर्जन होते. 'बायोकाँक्रिट' किंवा जेल (Hydro Gel) बनवणारी कंपनी 'प्रोमेथस' च्या लॉरेन बर्नेट यांनी ही प्रक्रिया कशी होते हे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की हे जेल बनवण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करणार्या डायोडच्या माध्यमातून पाण्याने भरलेल्या बायोरिअॅक्टर्स टँकमध्ये बॅक्टेरिया तयार केले जातात. त्यांना अकार्बनिक पोषण दिले जाते.
टँकला बुडबुड्यांनी भरून ठेवले जाते ज्यामुळे त्यांना कार्बन डायऑक्साईड मिळतो. प्रत्येक चार ते सहा तासांमध्ये बॅक्टेरिया दुप्पट होतात. त्यांना दुसर्या टँकमध्ये ठेवले जाते. तासाभरात क्रिस्टलयुक्त हायड्रो जेल (Hydro Gel) तयार होते. हे जेल साच्यात टाकून व मशिनने दाबून काही सेकंद ठेवले जातात. त्यांच्यापासून ब्लॉक तयार होण्यासाठी आठ दिवस लागतात. वाळूतही हे जेल मिसळून सिमेंटसारखा पदार्थ बनवता येऊ शकतो. यामुळे कार्बन उत्सर्जन 90 टक्क्यांपर्यंत घटवले जाऊ शकते. पुढील वर्षापासून या जेलचे औद्योगिक उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.