हैदराबादच्या संथ फलंदाजीवर ब्रायन लाराची खरमरीत टीका

हैदराबादच्या संथ फलंदाजीवर ब्रायन लाराची खरमरीत टीका

हैदराबाद, वृत्तसंस्था : दिल्ली कॅपिटल्स या क्रमवारीतील तळाच्या संघाकडूनही नामुष्कीजनक पराभव पत्करणार्‍या सनरायजर्स हैदराबाद संघावर या संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा यांनी कडाडून टीका केली. पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकांत हैदराबाद अतिशय संथ फलंदाजी करत असल्याने व अगदी उशिराने संघाला जाग येत असल्याने याचा फटका बसत असल्याचे निरीक्षण यावेळी लाराने नोंदवले. सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात हैदराबादला दिल्लीविरुद्ध 7 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत लारा बोलत होता.

या सामन्यात दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली, तर प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबादला 20 षटकांत 6 बाद 137 धावांवर समाधान मानावे लागले होते. सनरायजर्स हैदराबादसाठी हा हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला.

आमच्या फलंदाजांनी खूपच उशिराने आक्रमणावर भर दिला. मधल्या षटकात विकेटस् जाऊ दिल्या, याचाही फटका बसला. पहिली 15 षटके अतिशय महत्त्वाची होती आणि यात आम्ही अधिक सरस स्थितीत असणे आवश्यक होते. वास्तविक, 145 धावांचे आव्हान सहज गाठणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात तसे झाले नाही, असे लारा पुढे म्हणाला. या लढतीत सनरायजर्सला पॉवर प्लेच्या 6 षटकांत केवळ 36 धावा करता आल्या आणि नंतर त्यांचा निम्मा संघ 14.1 षटकांत अवघ्या 85 धावांत गारद झाला होता.

या पराभवानंतर हैदराबादचा संघ नवव्या स्थानी राहिला असून, यापुढे बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना अर्थातच सर्वस्व पणाला लावावे लागेल. शिवाय, नशिबाची साथ लाभेल, अशी अपेक्षाही करावी लागेल. उर्वरित सामन्यांबद्दल बोलताना लारा म्हणाला, आम्हाला आणखी 7 सामने खेळायचे आहेत आणि यात जबाबदारीने खेळ साकारला तर बरीच समीकरणे बदलू शकतात. अर्थात, यासाठी सर्वच खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारणे महत्त्वाचे असणार आहे. आम्ही 7 सामन्यांत 5 पराभव पत्करले असले, तरी शेवटच्या दोन सामन्यांत आम्ही त्या तुलनेत बर्‍यापैकी संघर्ष केला. आता जी संधी मिळेल, त्याचे विजयात रूपांतर करणे महत्त्वाचे असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news