तारांगण भावले! आठवडाभरात साडेचार हजार नागरिकांची भेट; बच्चे कंपनीचे दुहेरी मनोरंजन

तारांगण भावले! आठवडाभरात साडेचार हजार नागरिकांची भेट; बच्चे कंपनीचे दुहेरी मनोरंजन

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: तारांगणच्या उद्घाटनानंतर अवघ्या सात दिवसांत 4 हजार 656 नागरिकांनी भेट देऊन तारांगण पाहण्याचा अनुभव घेतला. तारांगणला वाढणारा प्रतिसाद पाहून सोमवारी सुटीच्या दिवशीदेखील तारांगण सुरू ठेवण्यात येत आहे. सायन्स पार्क व तारांगण असे दुहेरी मनोरंजनाचा लाभ नागरिक घेत आहेत. विज्ञानविषयक आणि खगोलशास्त्रविषयक माहिती एकाच जागेत विद्यार्थी आणि नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी संपूर्ण भारत देशातील चार तारांगणांपैकी एक असलेल्या तारांगणाची उभारणी पिंपरी चिंचवड महापालिकेने केली आहे.

हायब्रीड कॉन्फिग्रेशन सिस्टमचे तारांगण

मुंबईतील नेहरू तारांगणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ऑप्टो- मेेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रीड कॉन्फिगरेशन सिस्टम प्रकारचे तारांगण उभारले आहे. यात 122 जणांची बैठक व्यवस्था आहे. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी यांना खगोल शास्त्राची माहिती मिळण्यासाठी तसेच आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगणप्रणाली असलेल्या हायब्रीड कॉन्फिग्रेशन सिस्टमद्वारे प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळत आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रकल्प

पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. तारांगणामध्ये सात प्रोजेक्ट आहेत. तारांगणमध्ये खगोलशास्त्रविषयक माहितीपर 12 क्लिप्स उपलब्ध आहेत. प्रत्येक शो हा अर्ध्या तासाचा आहे. तीन भाषांमध्ये हा शो दाखविण्यात येत आहे. यामध्ये 'द सन' या क्लिपला नागरिकांचा सर्वात जास्त प्रतिसाद लाभत आहे. सर्व शो फुल सुरू आहेत. यामध्ये तारांगण पाहण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनीच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसून येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news